वॉर्डबॉयवर रुग्णाने केले कात्रीने वार
By admin | Published: November 12, 2015 02:50 AM2015-11-12T02:50:27+5:302015-11-12T02:50:27+5:30
शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाने वॉर्डबॉयवर कात्रीने वार केल्याची घटना काल रात्री सव्वाअकरा वाजता
भिवंडी : शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाने वॉर्डबॉयवर कात्रीने वार केल्याची घटना काल रात्री सव्वाअकरा वाजता घडली. भागीरथ अमीलाल चौधरी (३६) असे रुग्णाचे नाव असून तो तालुक्यातील नदीनाका-शेलार येथे डोक्यात मार लागल्याने बेशुद्धावस्थेत विव्हळत पडला होता. तालुका पोलिसांनी त्याला बुधावारी रात्री इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.
अर्धवट शुद्धीत विव्हळत असलेल्या चौधरीवर उपचार न झाल्याने त्याला आत्माराम चंदे (४५) हा वॉर्डबॉय आपल्याला मारण्यासाठी आला आहे, असा संशय आला. त्यामुळे त्याने चंदे याच्यावर ड्रेसिंग रूममधील कात्रीने हल्ला केला. चंदे यांनी स्वत:चा बचाव केला तरी त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस कैची लागून ते जखमी झाले. त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार घेण्यासाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठवले आहे. तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना आपले नाव सांगत आपण राजस्थानाती असल्याचे सांगितले, तसेच आपल्यावर हल्ला करून रस्त्यात टाकून आपला ट्रक पळविल्याने हा प्रकार अर्धवट शुद्धीत घडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यास उद्या कोर्टात हजर करणार आहेत. (प्रतिनिधी)