भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:27 AM2020-12-21T04:27:16+5:302020-12-21T04:27:38+5:30
Bhiwandi : धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता.
भिवंडी : भिवंडीत आगी लागण्याचे सत्र सुरूच असून धाग्यांचे कोम साठवून ठेवलेल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना वळगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या कॉम्प्लेक्समध्ये एसआर ट्रान्सपोर्ट या गोदामात मोठ्या प्रमाणात धाग्यांचे कोम साठवून ठेवलेले होते. या गोदामाला आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. या धुरामुळे अग्निशम दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. आगीची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे व कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू हाेते. आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजलेले नाही. आग विझवताना भिवंडी अग्निशमन दलाची गाडी अचानक बंद पडल्याने काही वेळ वाया गेला.
वेळ गेला वाया
- आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजलेले नाही. आग विझवताना भिवंडी अग्निशमन दलाची गाडी अचानक बंद पडल्याने काही वेळ वाया गेला.
- कल्याण व ठाणे अग्निशमन दलासह भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते.