वारकरी संप्रदायाने समाज बदल टिपावेत
By admin | Published: May 1, 2017 05:57 AM2017-05-01T05:57:52+5:302017-05-01T05:57:52+5:30
वारकरी सांप्रदाय हा सर्वांना सामावून व सांभाळून घेणारा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सांप्रदायाने २१ व्या शतकातील समाजाच्या
डोंबिवली : वारकरी सांप्रदाय हा सर्वांना सामावून व सांभाळून घेणारा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सांप्रदायाने २१ व्या शतकातील समाजाच्या मानसिकतेतील बदल ध्यानात घ्यावेत, अशी सूचना हभप बाबामहाराज सातारकर यांनी केली.
रोटरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मातोश्री बेबीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ मयुरेश्वर मित्र मंडळ, राजमाता जिजाई महिला हित मंडळ आणि बबन गायकवाड यांच्या पुढाकाराने नुकतेच देसलेपाडा-भोपर येथील ‘लोढा हेरिटेज गाडन’मध्ये नुकतेच सातारकर महाराज यांचे प्रवचन झाले.
ते म्हणाले, की आई-वडील हे डोळ््याला दिसत असून ही कळत नाहीत. मग न दिसणारा पण असणारा देव कसा कळणार. देव, दीप आणि प्रकाश हे समीकरण आहे. जी सत्ता प्रकाशित करते तो देव. बोलून, चालून, ऐकून याचे नाम चालू आहे, तो देव आहे. माणूस देवाजवळ सुखाची याचना करतो. परंतु देवाजवळ सुख नाही. देव सुखरूप आहे, तर सुख देण्यासाठी संत आहेत. समाधान पाहिजे असेल तर कीर्तनात बसा. आत्मा हा सर्वांजवळच आहे. परंतु ज्याच्या संगतीत आत्मा लक्षात येतो. त्याला महात्मा म्हणतात. देहरूपी क्षेत्रावर आपली मालकी असली तरी या देहातील देव दाखवणारा संत आहे. आपले घर सुशोभित दिसावे, यासाठी घराची ज्या प्रमाणे सजावट केली जाते, त्याप्रमाणे प्रत्येकाने देवाची आराधना करून मन स्वच्छ केले पाहिजे. वारकरी सांप्रदाय निर्माण होण्याचे कारण अध्यात्म तर आहेच, पण सामाजिकही आहे. विठ्ठल विटेवर उभे राहण्याचे कारण आई-वडिलांची सेवा आहे. सुख पाहिजे असेल तर माणसाला संतांच्या जवळ जावे लागेल, असा संदेश त्यांनी दिला. (प्रतिनिधी)