रस्त्यावर झोपणाऱ्या गाेरगरिबांना मायेची ऊब; सामाजिक संस्थेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:41 PM2020-12-03T23:41:09+5:302020-12-03T23:41:53+5:30
संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांच्या अंगावर ब्लँकेट टाकून आपले सामाजिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहेत.
नितीन पंडित
भिवंडी : सध्या राज्यातील अनेक भागांसह भिवंडीत थंडी वाढली असल्याने या थंडीत रस्त्यावर व दुकानांच्या पायऱ्यांवर कुडकुडत झोपणाऱ्या गरीब व गरजूंच्या अंगावर ब्लँकेट टाकून त्यांना मायेची ऊब देण्याचे काम शहरातील अबूबकर सिद्दीक सोशल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष शोएब मोमीन यांनी रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांच्या अंगावर ब्लँकेट टाकून आपले सामाजिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहेत. शहरात थंडी सुरू झाल्यापासून आतापर्यंत शंभरहून अधिक ब्लँकेटचे मोफत वाटप या संस्थेकडून करण्यात आले आहे. कुडकुडणाऱ्या थंडीत ऊब मिळाल्याने गरीब, गरजू संस्थेचे आभार व्यक्त करत आहेत. मोमीन यांनी २०१४ मध्ये संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला या संस्थेचे नऊ सदस्य होते. मात्र, आता या संस्थेचे सामाजिक कार्य विस्तारल्यामुळे सुमारे ७० हून अधिक सभासद सहभागी झाले असून डॉक्टर, वकील, सीए, समाजसेवक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती या संस्थेच्या सभासद झाल्या आहेत. संस्थेच्या वतीने गरिबांसाठी मोफत लग्नसोहळा, धान्य व औषधवाटप, आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जात असल्याची माहिती मोमीन यांनी दिली. संस्थेचे सभासद सिद्दीकी मिसबहाउद्दीन, आतिफ अन्सारी, रमीझ अन्सारी, हुसेन अन्सारी, शमशाद अन्सारी, सुफियान अन्सारी आदी सदस्य संस्थेच्या सामाजिक कामांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेत असतात.