निलंबनाच्या मागणीसाठी मंगळवारी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:59+5:302021-02-27T04:53:59+5:30
ठाणे : परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करूनही गेल्या १० वर्षांत ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक हे केवळ ...
ठाणे : परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करूनही गेल्या १० वर्षांत ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला ते केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे; अन्यथा, मंगळवारी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला. शमीम खान यांनी शुक्रवारी सभापती विलास जोशी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाणे परिवहन सेवेचा बोजवारा उडाला असून, त्यास टीएमटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला.
शमीम खान यांनी सांगितले की, परिवहन सेवेत कार्यरत असलेले अधिकारी भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांच्यामुळेच परिवहन सेवा तोट्यामध्ये चालत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे परिवहन सेवा आणि परिवहन समिती बदनाम होत आहे. असे अधिकारी सेवेत राहिले तर परिवहन सेवा फायद्यात येणार नाही. त्यामुळे परिवहन सेवेचे उपव्यवस्थापक यांना तत्काळ निलंबित करावे; जर निलंबित करण्यात अडचणी असतील तर त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास मंगळवारी परिवहन कार्यालयाच्या दारात नितीन पाटील, मोहसीन शेख, प्रकाश पाटील यांच्यासह धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.
..............
मुंब्रा येथून कोकणात एसटी बस सोडण्यासाठी प्रयत्न
मुंब्रा-कौसा भागात कोकणातील अनेक लोक वास्तव्यास आहेत. या लोकांना कोकणात जाण्यासाठी सुविधा नाहीत. त्यामुळे मुंब्रा येथून बससेवा सुरू करण्यासाठी टीएमटी सभापतींनी प्रयत्न करावेत, अशी विनंती मुंब्रावासीयांनी केली. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली लावू. मुंब्रा ते खेड अशी बससेवा सुरू करू, असे आश्वासन सभापती विलास जोशी यांनी दिले.
................