२७९ कंत्राटी कामगारांचा ठेका रद्द करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:45 AM2021-09-23T04:45:48+5:302021-09-23T04:45:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या नावाखाली २७० कंत्राटी कामगारांना ठेका देण्यास महापालिका कामगार संघटनेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या नावाखाली २७० कंत्राटी कामगारांना ठेका देण्यास महापालिका कामगार संघटनेने विरोध करून, २७ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा दिला. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना कंत्राटी कामगारांच्या ठेक्यावर वर्षाला १० कोटींचा खर्च करण्याचा घाट सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपने घातल्याचा आरोप कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी बुधवारी केला.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना व मित्रपक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, साई व ओमी कलानी टीम समर्थकांची सत्ता आहे. भाजप व रिपाइं पक्ष विरोधात आहेत. मात्र कंत्राटी सफाई कामगारांचा ठेका देताना एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेना व भाजप एकत्र आल्याचे चित्र शहरात आहे. शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, साई पक्ष व ओमी कलानी टीम समर्थकांनी कंत्राटी ठेक्याला विरोध केल्याची माहिती साठे यांनी पत्रकारांना दिली.
सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कंत्राटी कामगारांचा घाट भाजप-शिवसेनेने घातल्याचा आरोप त्यांनी केला. प्रायोगिक तत्त्वावर कोणत्याही एका प्रभाग समितीमध्ये कंत्राटी कामगार एका वर्षासाठी ठेक्यावर घेणार असून त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
महापालिकेत ३०५ सफाई कामगार घेण्याचा प्रश्न १५ वर्षांपासून ऐरणीवर असून त्यातील अनेक कामगारांची वयोमर्यादा संपली आहे, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. ठेक्यावर कंत्राटी कामगार घेण्यापेक्षा महापालिकेने रिक्त कामगारांच्या जागेवर थेट सफाई कामगारांची भरती करण्याची मागणीही होत आहे.
जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ?
शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. मात्र अद्यापही महापालिकेने कोणतीही पूर्वतयारी अथवा निविदा मागविली नसल्याने, जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा विचार महापालिका करीत आहे, अशी टीकाही सर्वस्तरातून होत आहे. भाजप आणि शिवसेना कंत्राटी कामगार व जीआयसी मालमत्ता सर्वेक्षण व मॅपिंग ठेक्यावरही एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
-------------