भाजपाला मोठा धक्का; मीरा-भाईंदरच्या महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:05 PM2021-06-22T20:05:12+5:302021-06-23T00:02:58+5:30
BJP Mira Bhayandar News : माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्वास निवेदन दिले असून २४ तारखेपर्यंत विचार केला नाही तर पुढची दिशा ठरवू असा इशारा मेहता समर्थकांनी दिला आहे.
मीरा रोड - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केल्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच मंगळवारी भाजपच्या ६१ पैकी ३९ नगरसेवकांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या नियुक्तीला विरोध करत पक्षाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू असे थेट आव्हानच भाजपा नेतृत्वास दिले आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्वास निवेदन दिले असून २४ तारखेपर्यंत विचार केला नाही तर पुढची दिशा ठरवू असा इशारा मेहता समर्थकांनी दिला आहे.
मीरा भाईंदर भाजपा जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाले. व्यास हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळे व्यास यांच्या नियुक्तीने मेहता समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र होते. व्यास यांच्या नियुक्तीबद्दल काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असताना मेहता समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून मात्र व्यास यांच्या नियुक्तीचे स्वागत केले गेले नाही.
महापालिकेत भाजपाचे ६१ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेतील महत्वाच्या पदांवर मेहता समर्थकांची वर्णी लागली आहे. मेहता यांची अर्धनग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या च्या अनुषंगाने त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केले असले तरी सत्ताधारी भाजपाच्या पालिकेच्या व पक्ष कामकाजात त्यांचा सहभाग असतो. त्यातच पक्ष संघटना सुद्धा हातात ठेवण्यासाठी मेहता समर्थक व मेहता विरोधक यांच्यात रस्सीखेच आहे. याआधी देखील हेमंत म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी भाजप नेतृत्वाने नियुक्ती केल्यावरून सुद्धा मेहता समर्थकांनी म्हात्रे यांचा विरोध करत त्यांना जिल्हाध्यक्ष मानत नाही अशी भूमिका घेतली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाईंदर पश्चिम येथील भाजपा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन होऊन सुद्धा त्या कार्यालयास मानत नसल्याची भूमिका घेण्यात आली होती.
व्यास यांच्या नियुक्तीचे कळतात मंगळवारी मेहता समर्थक काही नगरसेवकांनी सकाळी मेहता यांची भेट घेतली. त्यानंतर खाजगी बस व खाजगी गाड्यांमधून नगरसेवक पदाधिकारी आदी भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दाखल झाले. तेथे व्यास यांच्या नियुक्तीला विरोध करणारे पत्र सह्यांच्या यादीसह देण्यात आले . भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सागर बंगल्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या सोबत जोडलेल्या सह्यांच्या यादीत भाजपच्या ३९ तर शिवसेनेच्या २ नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्यात महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सभागृहनेता प्रशांत दळवी सह प्रभाग समिती सदस्य, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, परिवहन समिती सभापती आदींचा समावेश आहे.
स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेताच ह्या नियुक्ती ची माहिती व्हाट्सअपवरील पत्रावरून मिळाल्याचे महापौर हसनाळे म्हणाल्या. त्यामुळे स्थानिक नेते नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी पक्ष नेतृत्वाला निवेदन दिले आहे. जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना असला तरी स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला गेला नाही. फडणवीस यांनी २४ तारखेच्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. स्थायी समिती सभापती दिनेश जैन म्हणाले की, मेहता आमचे नेते असून त्यांना व आम्हाला कोणालाच विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय घेतला गेला आहे. मेहता समर्थक सभागृहनेते प्रशांत दळवी यांनी तर दोन दिवसांची मुदत देत अन्यथा पुढची दिशा ठरवू असा निर्वाणीचा इशारा पक्ष नेतृत्वास दिला आहे.