कोरोनाबाधितांच्या सानिध्यात काम केलेल्या योद्धाने वाढदिवस साजरा केला स्मशानभूमित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 08:30 PM2020-12-15T20:30:52+5:302020-12-15T20:31:15+5:30
कोरोनाने मृत्यू झाल्यास मृतदेह गावातील स्मशान भूमित येणार नाही या विचाराने व्याकूळ होऊन घेतला निर्णय
- कुमार बडदे
मुंब्राः कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंतीम विधीसाठी मृतदेह गावातील स्मशानभूमिमध्ये येणार नाही.या विचारांनी व्याकूळ झालेल्या नरेश पाटील या सरकारी कर्मचा-याने १४ डिसेंबरच्या रात्री त्यांचा ५५ वा वाढदिवस चक्क ते रहात असलेल्या दिवा गावातील दातिवली येथील स्मशानभूमित साजरा केल्याची लक्षवेधी घटना उघडकीस आली. ते बृह्न्मुंबई महापालिकेच्या माटुंगा येथील रुग्णालय देखभाल विभागात काम करत आहेत.
मागील आठ महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या सानिध्यात काम केलेल्या पाटील यांच्या समोर अनेक बाधितांचा मृत्यू झाला आहे.सर्व शासकीय नियम पाळून कर्तव्य बजावत असलेल्या पाटील यांना सुदैवाने अद्याप कोरोनाची कुठलीही बाधा झालेली नाही.परंतु जर बाधा झालीच आणि त्यातच मृत्यू झाला तर मृतदेहही गावातील स्मशानभूमित येणार नाही.या विचाराने व्याकूळ होऊन त्यांनी नातेवाईक तसेच मित्रमंडळीसह स्मशानभूमित वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती लोकमतला दिली. त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी अंतीम संस्कारापूर्वी मृतदेह ज्या धक्क्यावर ठेवतात त्या धक्क्यावर प्रथम फुले टाकली.आणि नंतर त्या ठिकाणी केक कापून तो स्वता खावून इतरांनाही खाऊ घातला.