Jayant Patil : कार्डिलिया प्रकरणातील अमली पदार्थ खरे होते का?, जयंत पाटील यांची शंका : २५ कोटींच्या कथित गौप्यस्फोटावरून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:17 AM2021-10-25T06:17:02+5:302021-10-25T06:18:01+5:30
Jayant Patil : केंद्र सरकार आणि भाजपकडून एनसीबीसारख्या यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. लोकांकडून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे, असे आर्यन खान प्रकरणातील २५ कोटींच्या ड्रग्ज बॉम्बच्या कथित बाबी ऐकल्यावर आणि पाहिल्यावर दिसते, असेही ते म्हणाले.
ठाणे : कार्डिलिया क्रूझ प्रकरणात सापडलेले अमलीपदार्थ खरे होते का? ते कोणी ठेवले? या घटनाक्रमात पकडलेल्यांना घेऊन येताना भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या जवळची लोकं समोर आली. त्यानंतर जर पैशाची मागणी होत असेल तर यात बरीच लोकं असण्याची शक्यता आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकार आणि भाजपकडून एनसीबीसारख्या यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. लोकांकडून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे, असे आर्यन खान प्रकरणातील २५ कोटींच्या ड्रग्ज बॉम्बच्या कथित बाबी ऐकल्यावर आणि पाहिल्यावर दिसते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागातील आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि समस्यांबाबत आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी पाटील यांचा सध्या दौरा सुरू आहे.
याच दौऱ्याच्या निमित्ताने ठाणे, कळवा, मुंब्रा येथील कार्यकर्त्यांशी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या उपक्रमांतर्गत त्यांनी रविवारी सायंकाळी संवाद साधला. त्याआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आर्यन प्रकरणात २५ कोटींची मागणी केल्याचा खुलासा किरण गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर ते म्हणाले, हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणावरुन वातावरण सध्या तापले आहे.
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील नेते स्वगृही परतणार
इतर पक्षांमध्ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला असून, ते पुन्हा स्वगृही परततील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादीतून गेलेलेच नव्हे तर भाजप तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दिसतील, असेही ते म्हणाले.
२०२२ मध्ये होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविण्याचा विचार करीत असल्याचेही एका प्रश्नाला
उत्तर देताना स्पष्ट केले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे हेही उपस्थित होते. ठाणे पालिकेच्या दृष्टीने सगळ्या राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केलेली आहे.