आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली त्यात आमच्या एकट्याचाच दोष होता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:25 AM2020-01-13T00:25:49+5:302020-01-13T06:31:59+5:30

हा संसार उभा करताना त्यांच्या डोक्यावरील छप्पर सहीसलामत होते. या एकाच जमेच्या बाजूवर त्यांनी पुन्हा एकदा उभारी घेऊन जोमाने संसार उभा केला.

Was it our only fault when it came time for us to be homeless? | आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली त्यात आमच्या एकट्याचाच दोष होता का?

आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली त्यात आमच्या एकट्याचाच दोष होता का?

Next

कुमार बडदे, मुंब्रा

निसर्गाने झोडपल्यानंतर त्यातून सावरत असलेल्या दिव्यातील अनेक कुटुंबांच्या घरांवर सरकारच्या महसूल विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई केली. या कारवाईमुळे हवालदिल झालेल्या कुटुंबांची अवस्था निसर्गाने झोडले आणि राजाने मारले अशी झाली असून दाद कुणाकडे मागायची असा टाहो फोडत दिवस ढकलत आहेत. त्यांचा हा टाहो ऐकण्यासाठी किंवा त्यांना दिलासा देण्यासाठी कुणीही त्यांच्यापर्यंत फिरकत नसल्यामुळे सर्वांनीच कठीण प्रसंगात त्यांची साथ सोडली आहे.

पाच महिन्यांपूर्वी आठ दिवसांमध्ये दोन वेळा झालेली अतिवृष्टी तसेच एक दिवस बारवी धरणाचे उघडण्यात आलेले दरवाजे त्याचवेळी खाडीला आलेली भरती यामुळे खाडीचे पाणी दिव्यातील अनेक वसाहतींप्रमाणेच खाडीजवळ असलेल्या जीवदानीनगरमधील चाळीत शिरले होते. यामध्ये अनेकांच्या घरांमधील विजेची उपकरणे तसेच इतर संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या होत्या. त्यावेळी ठामपाने केलेली तुंटपुंजी अन्नधान्याची मदत मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कथित जाचक अटींची पूर्तता करण्यास असमर्थ ठरलेल्या जीवदानी नगरमधील बहुतांश कुटुंबांना ती मदत मिळाली नव्हती. मात्र त्यानंतरही ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या वृत्तीने त्यांनी परिस्थितीला तोंड देत मागील चार महिन्यात कंबर कसून पाण्यात वाहून गेलेला संसार पुन्हा उभा केला.

हा संसार उभा करताना त्यांच्या डोक्यावरील छप्पर सहीसलामत होते. या एकाच जमेच्या बाजूवर त्यांनी पुन्हा एकदा उभारी घेऊन जोमाने संसार उभा केला. परंतु अतिवृष्टीच्यावेळी त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या छपरावरच प्रशासनाने घाला घातला. यापूर्वीच करण्यात येणारी ही कारवाई रहिवाशांच्या रेट्यामुळे स्थगित करण्यात आली होती. सहा जानेवारीला पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९ चाळींमधील ३८५ घरे आणि ३५ व्यावसायिक गाळे जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे क्षणार्धात शेकडो कुटुंबे बेघर झाली.

कारवाई होणार असल्याची कुणकुण लागल्यापासून तसेच एकदा ती स्थगित झाल्यापासून अखेर ती होईपर्यंत तसेच झाल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबातील प्रत्येक जण त्यांचे नेमके काय चुकले याचा शोध घेत आहेत. आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली त्यात आमच्या एकट्याचाच दोष होता का? ज्या ठिकाणी आम्ही राहात होतो ती आमची एकट्याचीच चूक होती का? आमच्या आर्थिक तसेच इतर असहायतेमुळे आम्ही तेथे राहात होतो ही आमची चूक होती तर आम्हाला सुविधा का पुरवल्या, आमच्या असहायतेचा लाभ उठवून कारवाईच्यावेळी आम्हाला

वाऱ्यावर सोडलेल्यांचा यात काहीच दोष नाही का? यासारखे अनेक भांडावून सोडणारे प्रश्न ही कुटुंबे विचारत आहेत.
ज्या १९ चाळींवर हातोडा फिरला त्यातील घरे एका वर्षात किंवा महिन्यात उभी राहिली नव्हती. तोडण्यात आलेली बहुतांश घरे मागील १२ ते १५ वर्षांपासून तेथे अस्तित्वात होती. इतक्या वर्षात तेथे पाणी,वीज या मूलभूत सुविधा पुरवल्या होत्या. तोडण्यात आलेली घरे कांदळवन नष्ट करून बांधण्यात आली होती. ती अनधिकृत होती तर पाणी,वीजेसारखी सुविधा पुरवणारे अधिकारी काय डोळ््यावर झापडे बांधून घरांची कागदपत्रे तपासून सुविधा पुरवत होते का? सुविधा पुरवण्यापूर्वी घरे अधिकृत की अनधिकृत याची खातरजमा करण्यासाठी कोणते मापदंड वापरण्यात आले होते. यासाठी ज्या कथित समाजसेवकांनी मदत केली होती ते कारवाईच्यावेळी लपून का बसले होते. कारवाई रोखण्यासाठी तसेच ती झाल्यानंतरही ते बेघरांची साधी विचारपूस करण्यासाठीही का फिरकले नाहीत.


आमची घरे अनधिकृत होती तर त्या घरात राहणाºया मतदारांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी अधिकृत कसे असा संतप्त सवाल बेघर झालेल्या हेमा ताडे या महिलेने उपस्थित केला. बेघर झालेल्यांनी कारवाईतून वाचलेले संसारोपयोगी सामान नातेवाईक तसेच कारवाईतून वाचलेल्या घरांमध्ये ठेवले आहे. परंतु या परिसरातील घरे ही साधारणत: १५० ती २५० चौरस फुटाची असल्यामुळे एका घरात दोन कुटुंबाचे सामान ठेवताना दोन्ही कुटुंबांची कमालीची तारांबळ उडत आहे. घरांमध्ये वावरण्यासाठी नाममात्र जागा शिल्लक राहिली असल्याची दृष्ये बेघर कुंटुबांचे सामान ठेवलेल्या अनेक घरांमध्ये सध्या दिसत आहे.

बेघर झालेल्या कुटुंबांची सध्याची परिस्थिती बघून ज्यांच्या घरात सामान ठेवले आहे ते कुजबूज न करता माणुसकीच्या दृष्टिकोनातून सांभाळून घेत असले तरी असे दुसºयाच्या घरी सामान ठेवून त्यांना आणखी किती दिवस त्रास द्यायचा असा विचार बेघर झालेल्यांना सतावत आहे. कारवाईमुळे बेघर झालेल्या कुटुंबियांच्या घरांमधील विद्यार्थ्यांच्या शाळांचे वेळापत्रकही कोलमडले असून त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असल्याची माहिती प्रकाश पाशी या पालकाने दिली.
 

Web Title: Was it our only fault when it came time for us to be homeless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.