आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:18+5:302021-08-20T04:46:18+5:30
ठाणे : इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला विचारत ...
ठाणे : इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला विचारत ठाणे शहरातील सर्वच पेट्रोलपंपांबाहेर होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा...पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले...आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर नमूद करून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला असतानाच भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेद्वारे जनतेचा आशीर्वाद मागितला जाणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवाल करीत हे होर्डिंग्ज् लावण्यात आले आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे खोट्या घोषणा केल्या. महागाई कमी करू; शंभर लाख कोटींची गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करु, अशी आश्वासने त्यांनी दिली. पण, प्रत्यक्षात इंधनाचे दर वाढतच आहेत. त्यामुळे लोकांचा खोटा आशीर्वाद घेण्याचे काम भाजप करीत आहे; कोविडच्या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अथक प्रयत्न करीत असतानाच त्याला खो घालण्याचे काम जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे ही यात्रा रद्द करावी; महागाईचा भडका कमी करावा आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या यात्रेला सामान्य लोक शिव्याच घालत आहेत, याची त्यांना जाणीव करून देण्यासाठीच हे होर्डिंग्ज लावले आहेत, असे परांजपे यांनी सांगितले. ठाण्यात कोविड नियमांचे उल्लंघन करून भाजपचे जे नेते फिरले, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही परांजपे यांनी केली.