कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीएमटीची धुलाई, प्रवाशांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:55 AM2020-03-19T01:55:12+5:302020-03-19T01:55:41+5:30
वाहक आणि चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.
ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महापालिका परिवहनसेवेने बसची धुलाई सुरू केली आहे. कोरोनामुळे प्रवासी घटल्याने परिवहनच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. वाहक आणि चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाच्या सावटाखाली आता परिवहनच्या बसची धुलाई सुरू झाली आहे. कळवा, वागळे, मुल्लाबाग, आनंदनगर भागातील डेपोत प्रत्येक बस आतूनबाहेरून निर्जंतुक केल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलली असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले. परिवहनसेवेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने मास्क व सॅनिटायझरवाटप बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.
तपासणी करण्याचा सल्ला
परिवहनसेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सातत्याने विविध लोकांच्या संपर्कात येत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगिरीवर असताना त्यांनी मास्क अथवा रु मालाने नाक व तोंड झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साबण व पाण्याने हात धुणे. ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत, आदी सूचना सर्व कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहनसेवेकडून कर्मचाºयांना मास्कवाटप, हात धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, यासोबतच सर्व बसवर जनजागृतीपर पोस्टर्स, बसस्टॉपवर होर्डिंग, बॅनर लावून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच परिवहनसेवेत कार्यरत कर्मचारी यांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रिक हजेरी प्रक्रि या बंद केली असून, हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येत आहे.
टीएमटीचे उत्पन्न पाच लाखांनी घटले
दुसरीकडे परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात पाच लाखांची घट झाली असून प्रवाशांची संख्यादेखील ४० हजारांनी रोडावली आहे. त्यामुळे याचा फटकाही परिवहनसेवेला सोसावा लागत आहे.