अंबरनाथमधील कचरा बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:42 AM2021-01-11T00:42:47+5:302021-01-11T00:43:27+5:30
किसन कथोरे यांचा विरोध
अंबरनाथ : अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंडच्या समोर न्यायालयाचे काम सुरू असल्याने ते सुरू होण्याआधी या ठिकाणी असलेले डम्पिंग ग्राउंड हलविण्याबाबत निर्देश आले आहेत. त्यामुळे अंबरनाथचा कचरा हा बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याबाबत प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, अंबरनाथचा कचरा बदलापूरच्या डम्पिंगवर टाकण्यास आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देत अंबरनाथचा कचरा बदलापूरात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकत्रित प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ पालिकेने एकत्रित प्रकल्प अहवालही तयार केला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात हा प्रकल्प लांबणीवर पडला. त्यातच अंबरनाथ तालुक्याचे न्यायालय चिखलोली येथे उभारण्यात येत असून, त्याच्या समोरच अंबरनाथ पालिकेचे डम्पिंग ग्राउंडही आहे. या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात आग लागत असल्याने त्याचा त्रास हा न्यायालयाला होणार आहे. त्यामुळे न्यायालय सुरू करण्याच्या आधी डम्पिंग ग्राउंड हलविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेचा ९० टन कचरा हा नेमका कोठे टाकावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या एकत्रित प्रकल्पांतर्गत अंबरनाथचा कचराही बदलापूरच्या डम्पिंगवर टाकण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच आमदार कथोरे यांनी अंबरनाथचा कचरा बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यास विरोध दर्शविला आहे. एकत्रित प्रकल्प अद्याप सुरू नसल्याने अंबरनाथचा कचरा थेट बदलापुरात कसा येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, तसेच अंबरनाथच्या कचऱ्याचा त्रास बदलापूर शहराने का सहन करावा, असे म्हणत त्यांनी अंबरनाथचा कचरा बदलापुरात टाकण्याच्या कार्यवाहीला विरोध दर्शविला आहे.
बदलापूरचे डम्पिंग ग्राउंड हे बदलापूरच्या घनकचरा प्रकल्पासाठी उभारले आहे. त्याची देखरेख करणे हे सोपे नाही. त्यातच अंबरनाथचा कचरा आला, तर त्या समस्येत वाढ होणार आहे. त्यामुळे अंबरनाथच्या कचऱ्याला बदलापूरमधून विरोध राहणार आहे.
- किसन कथोरे, आमदार