कचऱ्याचे राजकारण पेटले
By admin | Published: May 6, 2017 06:00 AM2017-05-06T06:00:16+5:302017-05-06T06:00:16+5:30
कचऱ्याची समस्या हाताळण्यात आलेल्या अपयशावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकारण पेटले आहे. महापौर
मुरलीधर भवार/लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कचऱ्याची समस्या हाताळण्यात आलेल्या अपयशावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकारण पेटले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त ई. रवींद्रन यांनी अस्वच्छ शहरांकरिता जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी केली. कचऱ्याच्या समस्येवर मात करण्याकरिता तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर देवळेकर यांनी आयुक्त रवींद्रन यांना दिले.
स्वच्छ शहरांच्या यादीत झालेल्या घसरणीची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौर देवळेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तर आयुक्त रवींद्रन यांची तत्काळ बदली करून त्यांच्याजागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते मनसेचे प्रकाश भोईर यांनी केली.
महापौर देवळेकर म्हणाले की, स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण झाली, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोणतेही काम अंतिम टप्प्यात आल्यावर त्यासाठी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याची स्टंटबाजी करणाऱ्या मनसेला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. आधारवाडी प्रकल्प वेळेत सुरू होऊ शकला नाही, त्याचा फटका बसला आहे. मात्र, आता तेथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याकरिता कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. महिनाभरात कामाला सुरुवात होईल. कचरा वर्गीकरणात लोकसहभागाचे प्रयत्न केले जाणार आहेत. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती सक्षम आहे. मनसेने नाक खुपसून हस्तक्षेप करू नये, असा टोला महापौरांनी लगावला.
याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले म्हणाले की, ‘करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे महापालिकेची जोरदार घसरण झालेली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांचा वविशेषत: नगरपालिकांचा क्रमांक कल्याण-डोंबिवलीच्याही पुढे गेला आहे, हे पालिकेचे अपयश आहे.
आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ज्या नगरसेवकाच्या प्रभागात येते, ते शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णत: अपयशी ठरले आहे, हे आम्ही लोकप्रतिनिधी सतत बोलत होतो. ते सर्वेक्षणावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणण्याला आता प्रशासनाला वाव वाही. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कामावर न येताच त्यांची हजेरी कशी काय लागते?
घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी शहरांची संख्या पाहता आताच्या सर्वेक्षणात महापालिकेचा नंबर ५० टक्क्यांच्याही आत असल्याचा दावा केला. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या कामाला जून महिन्यात सुरुवात होईल. बारावे, उंबर्डे भरावभूमी क्षेत्र सुरू करण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होईल. हे सगळे झाल्यावर अस्वच्छ शहराचा डाग पुसून काढण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला.
कचराप्रश्नी उपाययोजनेसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर देवळेकर यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालिकेने ‘माझी डोंबिवली, माझं कल्याण’ हे अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांंनी केल्या. ज्या सोसायट्या स्वत:हून कचऱ्याची विल्हेवाट लावतील, त्यातील रहिवाशांना मालमत्ताकरात सूट देण्याचे आदेश त्यांनी दिले. इमारतीचे साहित्य उचलण्याकरिता लवकरच टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाईल.