उल्हासनगरात कचऱ्याचे विलगीकरण कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:49+5:302021-08-28T04:44:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात ओला व सुका कचरा एकत्रच उचलला जात असून त्याचे विलगीकरण कागदावर असल्याची टीका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात ओला व सुका कचरा एकत्रच उचलला जात असून त्याचे विलगीकरण कागदावर असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. येत्या आठवड्यात काही प्रभागात कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.
उल्हासनगराचे म्हारळगावाजवळील राणा खदान डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्यानंतर शहरातील कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न महापालिकेसमोर उभा ठाकला होता. अखेर कॅम्प नं.५ येथील खडी खदान येथे अवैधपणे नाईलाजास्तव डम्पिंग ग्राउंड सुरू केले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी घरोघरी कचरापेटी देण्याचे महापालिकेने जाहीर केले; मात्र अद्यापही ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्यास महापालिकेला यश आले नाही. तसेच डम्पिंग ग्राउंडसाठी उसाटनेगाव हद्दीत राज्य शासनाने एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला तीन वर्षांपूर्वी दिली; मात्र त्या जागेवर कचऱ्यावरील प्रक्रिया सुरू करण्यातही महापालिका यशस्वी झाली नाही.
आता खडी खदान डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लोच्या मार्गावर असून स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे. तर गेल्या आठवड्यात सत्ताधारी शिवसेनेने डम्पिंग हटविण्यासाठी आंदोलन केले. नियोजित उसाटनेगाव हद्दीतील डम्पिंग ग्राउंड सुरू होण्याला अडथळा निर्माण झाल्याने, कचऱ्याचा प्रश्न महापालिकेसमोर उभा ठाकला आहे. यामुळे खडी खदान डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी काही प्रभागात ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे संकेत सोंडे यांनी दिले; मात्र यामध्ये महापालिकेवर किती बोजा पडेल. याबाबतची माहिती त्यांनी दिली नसल्याने शहरात कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
आयुक्तांच्या बदलीची मागणी
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, डम्पिंग ग्राउंड व कचऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच नगररचना विभागातून बांधकाम परवाने, रिजेन्सीमध्ये रस्ते व वीज बिल, सार्वजनिक शौचालये आदी प्रश्न ऐरणीवर आले आहेत; मात्र तरीही आयुक्त पत्रकारांसह सर्वसामान्यांना भेटत नसल्याने त्यांच्या बदलीची मागणी होत आहे.