कमी वेगामुळे अनर्थ टळला!

By admin | Published: December 30, 2016 04:10 AM2016-12-30T04:10:05+5:302016-12-30T04:10:05+5:30

कुर्ला-अंबरनाथ लोकलच्या मोटरमनने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात थांबण्यासाठी लोकलचा वेग खूप कमी केला होता. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, असे लोकलच्या

Wasted due to low velocity! | कमी वेगामुळे अनर्थ टळला!

कमी वेगामुळे अनर्थ टळला!

Next

उल्हासनगर : कुर्ला-अंबरनाथ लोकलच्या मोटरमनने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात थांबण्यासाठी लोकलचा वेग खूप कमी केला होता. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, असे लोकलच्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर दिसून आले. एमएमआरडीए क्षेत्रातील पालिकांच्या हद्दीत रिक्षा, बस यांच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने आणि अंतरानुसार दर निश्चित नसल्याने अशा दुर्घटनेच्या वेळी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूटमार केली जाते. त्याचा अनुभव गुरूवारीही आला. या काळात पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
ठाण्याच्या पुढील भागात जाण्यासाठी रेल्वेला समांतर रस्ता आणि पर्यायी वाहतुकीची साधने नसल्याचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसला. त्याबाबत गेल्या २५ वर्षांत नेत्यांपासून, अधिकारी आणि यंत्रणांनी फक्त आश्वासनेच दिल्याचेच यानिमित्ताने उघड झाले.
कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरताच मोठा आवाज झाल्याने प्रवाशांत घबराट उडाली. अनेकांनी भीतीपोटी लोकलमधून उड्या मारल्या. डबे घसरून, फरपटत जाऊन विजेच्या खांबाला लागल्याने ओव्हरहेड वायरही तुटल्या. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या लोकलऐवजी लांबपल्ल्याची गाडी असती आणि कोणत्याही गाडीचा वेग अधिक असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातामुळे पुण्यापाठोपाठ मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवाही कोलमडली. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत-खोपोलीपर्यंतच्या सर्व स्थानकात प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली. लोकलच येत नसल्याने प्रवाशांना सुरुवातीला काय झाले, हे समजत नव्हते. आधी नीट उद््गोषमाही होत नव्हत्या. त्या नंतर सुरू झाल्या.
अंबरनाथ-कर्जतदरम्यान साधारण दर तासाला शटल वाहतूक चालवण्यात आली. तर विठ्ठलवाडी पूर्वेकडून कल्याण-डोंबिवली पालिकेची परिवहन सेवा, तसेच विठ्ठलवाडी एसटी बस डेपोतून कल्याणपर्यंत बस सोडण्यात आल्या. काहींनी विठ्ठलवाडी ते कल्याणदरम्यान रेल्वे रुळातून पायपीट केली, तर उल्हासनगर, अंबरनाथमधील प्रवाशांनी शेअर रिक्षेने कल्याण रेल्वे स्थानक गाठले. कल्याणसाठी शेअर रिक्षाचे माणशी दर ५० रुपये, तर स्पेशल रिक्षेसाठी २०० ते ३०० रुपये आकारले जात होते. सकाळी ८ नंतर शेअर तसेच स्पेशल रिक्षाही मिळेनाशा झाल्यावर चाकरमानी, विद्यार्थ्यांनी विठ्ठलवाडी बस डेपो गाठून कल्याण स्टेशनला जाणे पसंत केले. सकाळी १० नंतर मुंबईकडे एक-दोन लोकल गेल्या. पण नंतर चार तास हाही मार्ग बंद झाला. त्यामुळे प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नाही. (प्रतिनिधी)

रस्तोरस्ती कोंंडीने नागरिक हैराण
कल्याणला जाण्यासाठी व तेथून पुन्हा विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येण्यासाठी नागरिकांनी बस, रिक्षा, खाजगी मोटारींचा आधार घेतला. अचानक वाहनाची संख्या वाढल्याने विठ्ठलवाडी व कल्याण पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना ती सोडवण्यासाठी कसरत करावी लागली.

समांतर वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर
गेली अडीच दशके कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा मार्गाला पर्यायी वाहतुकीचा, समांतर रस्त्याचा मुद्दा ऐरणीवर येतो आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान समांतर वाहतूक सुरू करण्याचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र त्याबाबतही कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. एमएमआरडीए केवळ प्रस्ताव मांडले. दोन पुलांची कामे फक्त सुरू होणार आहेत. मेट्रोही प्रस्तावित आाहे. पण एमएमआरडीए क्षेत्रात एकत्रित वाहतूक सुरू करणे, पालिकांच्या क्षेत्रात बस-रिक्षांना मुक्त प्रवेश देणे, त्यांचे भाडे ठरवणे, समांतर वाहतूक व्यवस्था उभारणे याबाबत काहीही हालचाली झाल्या नसल्याचा फटका प्रवाशांना बसला.

Web Title: Wasted due to low velocity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.