सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:29 AM2018-02-23T02:29:53+5:302018-02-23T02:29:57+5:30
महापालिका शाळा क्रमांक २० व २ च्या प्रवेशद्बारा समोरील सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
उल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक २० व २ च्या प्रवेशद्बारा समोरील सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या आरोग्याला बाधा झाल्यास महापालिका जबाबदार असेल, असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेने दिले आहे.
उल्हासनगर महापालिका शाळेच्या इमारती ५० ते ६० वर्षाच्या जुन्या आहेत. शाळा दुरवस्थेचा पाढा मनसे विद्यार्थी सेनेने महापालिका आयुक्तांना वाचून दाखवल्यावर इमारत दुरूस्तीसाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांनी केली होती. त्यांच्या पुढाकारानेच काही शाळेची दुरूस्ती झाल्याची माहिती मनसेचे बंडू देशमुख यांनी दिली. मात्र काही शाळेची दुरवस्था कायम असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
कॅम्प नं-१ परिसरातील शाळा क्रमांक -२० व २ इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळा क्रमांक-२ संत नामदेव विद्यालयाच्या प्रवेशद्बारा समोर सांडपाण्याची वाहिनी तुटली असून या पाण्यातूनच मुलांसह शिक्षकांना शाळेत ये-जा करावी लागते. सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी हैराण झाले आहे. देशमुख, शहराध्यक्ष मनोज शेलार, मैनुद्दुन शेख आदींनी शहर अभियंता व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली.