गणरायाला सुरक्षेचे कवच, राज्य राखीव पोलीस, गृहरक्षक दलासह सीसीटीव्हीचीही ‘नजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:52 PM2017-08-27T23:52:47+5:302017-08-27T23:53:06+5:30
राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्या, ७०० गृहरक्षक दलाचे जवान, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांचे कार्यकर्तेही आणि ५०० हून अधिक पोलीस मित्र अहोरात्र सार्वजनिक गणेश मंडळांना सुरक्षा देत आहेत.
जितेंद्र कालेकर
ठाणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्या, ७०० गृहरक्षक दलाचे जवान, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांचे कार्यकर्तेही आणि ५०० हून अधिक पोलीस मित्र अहोरात्र सार्वजनिक गणेश मंडळांना सुरक्षा देत आहेत. स्वयंसेवकांबरोबरच सीसीटीव्हीचीही करडी नजर राहणार असल्याची माहिती गणेश मंडळांनी ‘लोकमत’ला दिली.
श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या १२ दिवसांतील उत्सव कालावधी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक अशा दोन ते तीन टप्प्यांमध्ये मंडळांनी आपआपल्या मूर्तीची काळजी घ्यावी. विशेषत: मूर्तीं आणि समईची काळजी घ्या. मूर्ती संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची डयूटी नेमावी. ध्वनी प्रदूषण टाळावे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा वापर करा. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, दर्शनाला येणाºया महिलांसह सर्व भाविकांनाही सुरक्षा मिळण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत, मंडपामध्ये कार्यकर्त्यांकडून सतत निगराणी ठेवावी. अशा अनेक सूचना सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या काळात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राज्याच्या पोलीस मुख्यालयातून जादा कुमक मागविण्यात आली आहे. याशिवाय, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (एका कंपनीत १०० जवानांची कुमक), आउ उपायुक्त, १५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ११३ निरीक्षक, २९६ उपनिरीक्षक तसेच सहायक निरीक्षक, ३० महिला उपनिरीक्षक, तीन हजार १६८ पुरुष तर ८३४ महिला कर्मचारी ७०० गृहरक्षक दलाचे जवान असा मोठा पोलीस बंदोबस्त गणेश उत्सवासाठी ठेवण्यात आला आहे. याशिवाय, नाकाबंदी, दिवसा रात्रीची गस्त, मंडळांना अचानक भेटी तसेच काही ठिकाणी गरज पडल्यास बॉम्ब शोधक नाशक पथकाकडूनही तपासणी केली जाणार आहे. कोणत्याही गंभीर घटनेच्या अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी मंडळांच्या बैठकीत केले.
ठाण्यात नावारुपाला आलेल्या तसेच वेगळी कलाकृती मांडण्यात प्रसिद्ध असलेल्या पाचपाखाडीतील नरवीर तानाजी मित्र मंडळाने सुरक्षेसाठी सुमारे दहा सीसीटीव्ही गणेश मंडपाच्या सभोवताली आणि आतील भागात लावले आहेत. याशिवाय, चार खासगी सुरक्षारक्षक, २४ तास कार्यकर्त्यांचा राबताही याठिकाणी असल्याचे मंडळाचे पदाधिकारी उदय मोरे यांनी सांगितले.
खेवरा सर्कल येथील मनोमय फाऊंडेशनच्या सार्वजनिक गणेश मंडळातही सहा सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी चार सुरक्षा रक्षक आणि २० ते ४० कार्यकर्त्यांची टीम सुरक्षेसाठी काही तासांच्या अंतराने तैनात ठेवल्याचे मंडळाचे सल्लागार माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे आणि खजिनदार किर्ती पटेल यांनी सांगितले. याशिवाय, आग प्रतिबंधासाठी वाळूच्या बादल्या, अग्निप्रतिबंधक सिलेंडर्सही ठेवण्यात आहे आहेत.
वाहतूक नियंत्रणाचीही शिस्त
खोपटच्या आशिर्वाद सार्वजनिक गणेश मंडळाने सुरक्षेसाठी चार सीसीटीव्ही लावले आहेत. १५ स्वयंसेवकांचा गट तयार करुन वाहतूकीला अडथळा न होण्यासाठी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांकडून वाहतूक नियंत्रण करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हेमंत वाणी यांनी सांगितले. यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बसविण्यात आली असून तिच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यकर्त्यांचा राबता ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रविंद्र फाटक यांच्या हिरामोतीनगर मित्र मंडळात आणि कोलबाड मित्र मंडळाच्या ‘कोलबाडच्या राजा’ची, नौपाडयातील नवतरुण मित्र मंडळ, पोलीस मुख्यालय, आणि महागिरीतील एकविरा मित्र मंडळाकडूनही सुरक्षेची अशाच प्रकारे खबरदारी घेण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
छेडछाड विरोधी पथक तैनात
उत्सव काळात महिला आणि पुरुषांच्या वेगळया रांगा करण्याच्या सूचना पोलिसांकडून मंडळांना दिल्या आहेत. पोलीस आणि पोलीस मित्रांचा समावेश असलेले छेडखानी विरोधी पथक, ५ दंगल नियंत्रण पथकेही तैनात केल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. तर महिला स्वयंसेवकांबरोबर १५० जीवन रक्षक विसर्जनासाठी तैनात केले असून तर दोन ते तीन तासांनी पोलिसांची गस्त सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी ठेवून सुरक्षेची पाहणी करण्यात येत असल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.