कल्याण-डोंबिवलीत गर्दीवर ड्रोनचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:08+5:302021-05-16T04:39:08+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, आजही काही ठिकाणी गर्दी होत असून, ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, आजही काही ठिकाणी गर्दी होत असून, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. ती कमी झाली नाही तर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी लक्ष्मी भाजी मार्केट बंद करून ते इतरत्र हलविण्याचा विचार केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी दिला. तसेच गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी शनिवारी सकाळीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आढावा घेतला. या कॉन्फरन्समध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिका उपायुक्त, प्रभाग अधिकारी आणि आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.
कल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटमधील गर्दी कमी होताना दिसून येत नाही. नियम पाळले जात नाहीत. त्याचबरोबर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी आहे. त्याचबरोबर दारूची दुकाने आणि आईस्क्रीम पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. त्याची शहानिशा करून त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी गर्दी रोखण्याच्या कारवाईत शिथिलता आली आहे, याकडेही आयुक्तांनी लक्ष वेधले आहे.
११ एप्रिल रोजी २४०० रुग्ण आढळून आले होते
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यावर ११ एप्रिल रोजी कोरोनाचे दोन हजार ४०० रुग्ण आढळले होते. गेल्या सात दिवसांत ही संख्या ५०० पर्यंत खाली आली आहे. पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले फिरताना दिसल्यास कठोर कारवाई करावी, असे आयुक्तांनी बजावले.
-रात्री अकरानंतरही फेरीवाले
कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर हॉटेलमध्ये लोक उभे राहून खाताना दिसतात. तसेच स्टेशनबाहेर रात्री ११ नंतर फेरीवाले दिसून येतात. नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल सील करण्यात यावीत. कारण, त्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा आहे. याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी व्यक्त केली आहे.
- मोकाट फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट
सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या लोकांची कल्याण जुने महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अँटिजन टेस्ट करावी. त्याकरिता रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना केली.
महापालिका हद्दीतील नाकाबंदी पॉइंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. पूर्व भागातून पश्चिमेकडे विनाकारण जाणारे अनेक नागरिक आढळून येतात. पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पहिल्या लॉकडाऊनसारखे काम करावे, अशा सूचना पोलीस उपायुक्त पानसरे यांनी दिल्या.
-----------