खर्चनिरीक्षकांचा उमेदवारांवर ‘वॉच’ - जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:25 AM2019-09-29T00:25:56+5:302019-09-29T00:26:40+5:30

विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत.

'Watch' on Expenditure Candidates - Collector | खर्चनिरीक्षकांचा उमेदवारांवर ‘वॉच’ - जिल्हाधिकारी

खर्चनिरीक्षकांचा उमेदवारांवर ‘वॉच’ - जिल्हाधिकारी

Next

ठाणे : विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत. त्यांच्या नियंत्रणातील मतदारसंघाच्या उमेदवारांच्या खर्चावर ते बारीक लक्ष ठेवणार आहेत. यानुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सुचनांचे यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भिवंडी, ग्रामीणसाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून विवेकानंद यांची नियुक्ती केली आहे. याप्रमाणच ते भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांचेही काम पाहणार आहेत. तर आशीषचंद्र मोहंती हे शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघाचे काम पाहणार आहेत. तसेच एस. आर. कौशिक यांच्यावर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण(पूर्व) मतदारसंघाची जबाबदारी आहे. शिवस्वरूप सिंग यांच्यावर डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे, या मतदार संघाची जबाबदारी आहे. तर उमेश पाठक हे मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपाखाडी, क्षेत्रात काम पाहणार आहेत आणि के. रमेश हे मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांमध्ये कार्यरत राहणार आहेत.

जिल्ह्यातील १८ मतदारसंघांचा ताबा या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सुचना या निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. या सर्व पथकांनी उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ट होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहे. पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमलेले फ्लाइंग स्कॉड, व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करण्याच्या विषयावर यावेळी चर्चाही करण्यात आली.

मद्यवाहतुकीवरही नजर

विनापरवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही. प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्या. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या सभा व कॉर्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
प्राप्तिकर व लेखाविभागाने योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. विविध समिती प्रमुखांनी यावेळी समित्यांच्या कामाची माहिती दिली.
 

Web Title: 'Watch' on Expenditure Candidates - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.