ठाणे शहरावर आता ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे राहणार वॉच; मुख्यमंत्री करणार शुभारंभ, ठाणे महानगरपालिकेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:48 AM2020-02-01T00:48:18+5:302020-02-01T00:48:47+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात १२०० सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून ते हाजुरी परिसरातील महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडले आहेत.
ठाणे : शहरात ठिकठिकाणी सीसी कॅमेरे लावल्यानंतर आता ठाणे महापालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याबरोबर खाडीतील नष्ट होणाºया कांदळवनांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीपासून पालिकेचा हा पायलेट प्रोजेक्ट सुरू होणार असून, ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या सीसीटीव्हीच्या कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण केले जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात १२०० सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून ते हाजुरी परिसरातील महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडले आहेत. या नियंत्रण कक्षाचे लोकार्पण आता होणार आहे. या कक्षात बसविण्यात आलेल्या यंत्रणेमध्ये शहराचा नकाशा टाकला असून त्याद्वारे शहरातील ठिकाणे निश्चित करून तेथील कॅमेºयाने टिपलेले चित्रीकरण पाहता येते. ही माहिती पोलिसांना गुन्ह्याच्या तपासासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. शहरात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्याची माहिती सीसी कॅमेºयांद्वारे नियंत्रण कक्षाला तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
या कॅमेºयाच्या माध्यमातून वाहतूककोंडीची माहिती पोलिसांना मिळणार असून त्याचबरोबर सोनसाखळी चोरीसह रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठीही मदत होणार आहे. मात्र या कॅमेºयात ठराविक उंचीवरील आणि अंतरावरील चित्रीकरण होणार आहे. एखाद्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली तर ती नेमकी कशामुळे झाली, याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेºयांचे चित्रीकरण १०० ते १५० फुटांवर केले जाणार असून त्यामुळे काही किलोमीटरच्या परिसराचे चित्रीकरण त्याद्वारे होणार आहे. त्याद्वारे कोंडी कशामुळे झाली आणि ती सोडविण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
अतिक्रमणांवर ठेवणार नजर
ठाणे महापालिका क्षेत्रात होणारी अनधिकृत बांधकामे आणि खाडीकिनारा भागातील कांदळवनावर भराव टाकून होणारे अतिक्र मण यावर ड्रोन कॅमेºयांची नजर राहणार आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे रोखणे शक्य होतील. तसेच ड्रोनकडून टिपल्या जाणाºया चित्रीकरणाच्या आधारे शहरात पायाभूत सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याशिवाय, शहर सुरक्षित ठेवण्यासाठीही ड्रोनची मदत होणार आहे.
पहिल्या टप्प्यात आलटूनपालटून चालणार काम
यानुसार पहिला पायलेट प्रोजेक्ट येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरूहोणार आहे. त्यानुसार, यामध्ये सुरुवातीला एक ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून दिला जाणार आहे. दोन आठवडे हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेच्या तीन परिमंडळांमध्ये तो आलटूनपालटून नजर ठेवणार आहे. त्यानुसार, परिमंडळ-१ मध्ये दिवा, कळवा, मुंब्रा, परिमंडळ-२ मध्ये नौपाडा, वागळे आणि उथळसर, तर परिमंडळ-३ मध्ये माजिवडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर या विभागांचा समावेश आहे. या तिन्ही परिमंडळांत दोन दिवसाआड हा ड्रोन कॅमेरा वापरला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे आणखी दोन ड्रोन घेऊन त्या माध्यमातून शहरावर उंचावरून भिरभिरती नजर ठेवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळ आणि सायंकाळची वेळ निश्चित केली जाणार आहे.