बेलगाम वाहनचालकांसह गुन्हेगारांवर १५० कॅमेरे ठेवणार वॉच;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:23+5:302021-07-14T04:44:23+5:30
अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात बसविण्यात आलेले १४०० कॅमेरे ...
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात बसविण्यात आलेले १४०० कॅमेरे जवळजवळ कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने शहरातील महत्त्वाच्या चौकांत आणि इतर ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे म्हणजेच गुन्हेगाराचा अचूक वेध घेणारे, सोनसाखळी चोरांना कॅमेऱ्यात कैद करणारे, अपघाताची अचूक माहिती देणारे आणि सिग्नल तोडणाऱ्यांना लगाम घालणारे १५० कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी वाहतूक विभागाकडे तीन कोटींचा निधी आला असून त्यातील १२८ कॅमेरे हे एनपीआर म्हणजे अचूक वेध घेणारे असून २२ फिरत्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
ठाणे महापालिकेने बसविलेल्या १४०० पैकी ३० टक्के कॅमेरे बंद आहेत. उर्वरित कॅमेऱ्यांचादेखील काहीच उपयोग होत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आता वाहतूक विभागामार्फत येत्या दोन महिन्यात शहराच्या विविध भागात १५० कॅमेरे बसविले जाणार आहेत.
वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबर प्लेट, झेब्रा क्रॉसिंग कंट्रोल ठेवणे याशिवाय स्पीड कंट्रोल ठेवण्यासाठीदेखील हे कॅमेरे महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच २२ कॅमेरे हे फिरते कॅमेरे असणार असून ते ३६० अंश सेल्सिअसमध्ये अचूक वेध घेणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया आता राबवून पुढील दोन महिन्यात हे कॅमेरे बसविले जाणार आहेत.
या चौकात लावले जाणार कॅमेरे...
शहरातील वर्दळीची आणि अधिकच्या वाहनांची संख्या ज्या ज्या चौकात आहे, त्याठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामध्ये तिनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, कोर्टनाका, खोपट, पोखरण रोड नं. २, नौपाडा आदींसह शहरातील इतर महत्त्वाच्या चौकांमध्ये हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी फिरते कॅमेरे बसविले जाणार आहेत.
...........
शहरातील महत्त्वाच्या चौकात हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठीचा निधी प्राप्त झाला असून येत्या दोन महिन्यात ते बसविले जाणार आहेत. त्यामुळे एखाद्याने सिग्नल तोडून पळ काढला तरीदेखील त्याच्या वाहनावरील क्रमांकाचा अचूक वेध घेऊन कारवाईची पावती त्याच्या घरी जाणार आहे. तसेच इतर घटनांना आळा बसण्यासाठीदेखील हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.
- बाळासाहेब पाटील
उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस विभाग