नगरपालिका निवडणुकांचे वेध, शिवसेना शाखाप्रमुखांचा सपत्नीक भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 07:34 PM2020-11-06T19:34:09+5:302020-11-06T19:35:09+5:30
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीची तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
ठाणे - कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखाप्रमुखानेही सपत्नीक भाजपा प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपाने शिवसेनेला प्रतिआव्हान दिल्याची चर्चा बदलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीची तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेने यात आघाडी घेत शहरात ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालये सुरू करण्याचा व उदघाटनांचा धडाका लावला आहे. लवकरच इतर पक्षातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र यादव व राष्ट्रवादीच्या महिला शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कविता पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला आघाडी धर्माची आठवण करून देत याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनीही याची गांभीर्याने दखल घेत शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर स्वतः शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कविता पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयात आणले. आणि कविता पाटील यांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पदाधिकाऱ्याच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका पाहता भाजपा काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्याला पक्षप्रवेश देणाऱ्या शिवसेनेला भाजपाकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे शुक्रवारी(ता.६) शिरगाव शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख दिनेश भोसले यांनी सपत्नीक भाजपा प्रवेश केला. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते त्यांचा भाजपा प्रवेश झाला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते राजेंद्र घोरपडे ,बदलापूर शहर अध्यक्ष संजय भोईर, कृष्ण भोसले, बाळाराम भोसले, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष रवींद्र चांदे, भाजयुमो शहराध्यक्ष प्रवीण चौधरी, ओबीसी मोर्चा महिला शहराध्यक्ष स्वाती बेळंके, महिला शहराध्यक्ष मंगला दळवी व मिनल मोरे आदी उपस्थित होते. भाजपा पदाधिकाऱ्याला प्रवेश देऊन एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपाने भोसले यांच्या प्रवेशातून केला असल्याची चर्चा बदलापूरतील राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू झालेली ही पक्ष प्रवेशाची स्पर्धा निवडणूक जवळ येईल तसे वाढत राहील. त्यामुळे आगामी काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे मत शहरातील राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.