पोर्न पाहणे हा गुन्हाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 02:32 AM2018-08-12T02:32:20+5:302018-08-12T02:32:23+5:30

पूर्वी आपण आपल्या भावना निकटवर्तीयांजवळ व्यक्त करायचो. काळाच्या ओघात ‘व्यक्त’ होण्याचे हे ‘प्लॅटफॉर्म्स’ बदलले आहेत. या काळाच्या ओघात आणखीही बरंच काही बदललंय. ज्या भावना आधी आपण खासगीत व्यक्त करतानाही अडखळायचो, त्या भावना आपण आभासी दुनियेमध्ये बिनदिक्कतपणे ‘शेअर’ करतो.

 Watching porn is a crime | पोर्न पाहणे हा गुन्हाच

पोर्न पाहणे हा गुन्हाच

Next

- राजू ओढे

पूर्वी आपण आपल्या भावना निकटवर्तीयांजवळ व्यक्त करायचो. काळाच्या ओघात ‘व्यक्त’ होण्याचे हे ‘प्लॅटफॉर्म्स’ बदलले आहेत. या काळाच्या ओघात आणखीही बरंच काही बदललंय. ज्या भावना आधी आपण खासगीत व्यक्त करतानाही अडखळायचो, त्या भावना आपण आभासी दुनियेमध्ये बिनदिक्कतपणे ‘शेअर’ करतो. असं करताना आपण काहीतरी बेकायदेशीर कृत्य करतोय किंवा त्यामुळे आपल्यावर मोठे संकट ओढवू शकते, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसते.

सोशल मीडियातून उभ्या झालेल्या आभासी दुनियेला हादरवून सोडणारी एक घटना ठाण्याला लागूनच असलेल्या भार्इंदर येथे नुकतीच घडली. येथील व्हॉट्सअ‍ॅपच्या काही युजर्सने ‘बीबी बॅड बॉइज’ नावाचा ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये लहान मुलांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स शेअर केल्या जायच्या. एक सदस्य या ग्रुपमध्ये चुकून जॉइन झाला. त्याने या ग्रुपमधील अश्लील पोस्ट्सबाबत भार्इंदरच्या नवघर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि लगेचच ग्रुपच्या अ‍ॅडमिनसह सदस्यांचेही अटकसत्र सुरू केले. ग्रुपचे जे सदस्य या व्हिडीओ क्लिप्स पाहायचे, त्यांनाही या प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या एखाद्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ शेअर केले, म्हणून गुन्हा दाखल होण्याची ही घटना दुर्मीळ आणि कुणाच्याही भुवया उंचावणारी आहे. या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील सदस्य आहेत. आमचे काय चुकले, आम्ही एकही अश्लील व्हिडीओ शेअर केला नाही. दुसरा सदस्य गैरकृत्य करत असेल, तर आमची काय चूक, त्याला आम्ही काय करू शकतो, असे अनेक प्रश्न हे सदस्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या युजर्सना उपयुक्त ठरतील, अशा कायदेशीर बाबींवर ठाण्याच्या ज्येष्ठ विधिज्ञ स्वाती चिटणीस (प्रधान) यांनी प्रकाशझोत टाकला.
भारतीय दंड संहितेचे कलम २९२ अश्लील साहित्याचा प्रसार करण्यास प्रतिबंध घालते. असा प्रसार मूर्त स्वरूपात असला, तरच हे कलम लागू होते. भारतात सोशल मीडियाचा प्रसार अलीकडच्या काळात वाढला. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याच्या कलम ६७ (ब) अन्वये सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील साहित्याचा प्रसार करणे, हा गुन्हा ठरतो. या आभासी दुनियेने आपले अवघे विश्व व्यापले आहे. सोशल मीडियाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एखाद्या गोष्टीच्या आहारी आपण एवढे गेलो असू, तर त्याचा वापर करताना काय खबरदारी घेतली पाहिजे, हेही आपण समजून घेतले पाहिजे.
अश्लील मेसेजेसची देवाणघेवाण करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुप्समध्ये बरेच जण सहभागी असतात. एखाद्या सदस्याने पाठवलेली अश्लील क्लिप किंवा इमेज आपण डाउनलोड करून पाहतो. त्यात गैर काय, असे आपणास वाटते. मात्र, कुणी आक्षेप घेतला, तर असे अश्लील मेसेज पाठवणाºयांसह पाहणारेही कायद्याच्या चौकटीत अडकतात. ग्रुपमधील एखादी व्हिडीओ क्लिप किंवा इमेज अश्लील आहे अथवा नाही, हे डाउनलोड केल्याशिवाय कसे समजणार? त्यामुळे पाहणारा दोषी कसा, असा प्रश्न साहजिकच कुणाच्याही मनात येईल. अ‍ॅड. स्वाती चिटणीस त्यावर म्हणाल्या, अश्लील क्लिप किंवा इमेज डाउनलोड करून पाहिल्यानंतर तुम्ही गप्प बसता, म्हणजे या बेकायदेशीर कृत्याला तुमची एक प्रकारे मूक संमतीच असते. याशिवाय, डाउनलोड केलेली क्लिप किंवा इमेज ग्रुपमधील सदस्यांनी आणखी कुणाला पाठवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा प्रथमदर्शनी ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आरोपीच्या नजरेने पाहते. तपासामध्ये अश्लील साहित्याच्या प्रसारात त्यांचा कोणताही सहभाग आढळला नाही, तर बहुतेकदा अशा सदस्यांना साक्षीदार म्हणून वापरले जाते. मात्र, अशा प्रकारच्या अश्लील ग्रुपमधील सर्वच सदस्यांना पोलीस चौकशीचा ससेमिरा सहन करावाच लागतो. याशिवाय, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, तो वेगळाच. म्हणूनच, सोशल मीडियाचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, हेदेखील अ‍ॅड. स्वाती यांनी सांगितले.
ग्रुपमधील एखाद्या सदस्याने अश्लील मेसेज पाठवला, तर आपला विरोध आपण वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवू शकतो. तो अन्य कुणालाही फॉरवर्ड करू नये. कुणी आपल्या वैयक्तिक नंबरवर अशा प्रकारचा अश्लील मेसेज पाठवला असेल, तर निषेध नोंदवून त्याचा नंबर ब्लॉक करता येऊ शकतो. या बाबी वरकरणी क्षुल्लक वाटत असल्या, तरी कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्या तुमचा बचाव करू शकतात. ग्रुपमध्ये सहभागी राहून अशा प्रकारच्या अश्लील संदेशांची देवाणघेवाण तुम्ही स्वीकारत असाल आणि त्यावर कोणताही आक्षेप घेत नसाल, तर या गैरप्रकारास ती तुमची मूक संमती गृहीत धरली जाते.
माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये पुरावे नष्ट करणे जवळपास अशक्य असते. सोशल मीडियावर तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीची कायमस्वरूपी नोंद होते. ती कुणीही नष्ट करू शकत नाही. त्यामुळेच त्याचा वापर अतिशय जबाबदारीपूर्वक करण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित गुन्हे दिवसागणिक वाढत आहे. दुर्दैवाने या गुन्ह्यांमध्ये अडकणारा वयोगट हा एकतर अल्पवयीन अथवा तारुण्याच्या उंबरठ्यावरील आहे. ही मंडळी केवळ अश्लील मेसेजच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या आक्षेपार्ह पोस्ट्सदेखील बिनधास्त लाइक आणि शेअर करत असतात. सोशल मीडियावर दिवसरात्र सक्रिय असणाºया या तरुण पिढीला आपण कुठेतरी कायद्याचे उल्लंघन करतोय, याची जाणीवही नसते. म्हणूनच, अ‍ॅड. स्वाती यांच्या मते, या समस्येवर सामाजिक जनजागृती हा एकमेव ठोस उपाय आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याबाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणात जागृती झाल्यास, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.

Web Title:  Watching porn is a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.