मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:11 PM2023-06-24T20:11:25+5:302023-06-24T20:15:59+5:30
भाईंदरच्या राई-मोरवा मार्गावर तुडुंब पाणी भरल्याने रस्ता पाण्यात गेला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात पावसाच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी पाणी साचले. मोरवा येथे कार खड्ड्यात गेली. सायंकाळनंतर पावसाने काहीसा जोर धरला नाही तोच शहरात ठिकठिकाणी पाणी तुडुंब भरले आहे.
भाईंदरच्या राई - मोरवा मार्गावर तुडुंब पाणी भरल्याने रस्ता पाण्यात गेला आहे. येथे पालिकेने खोदलेले कच्चे गटार पाणी तुंबल्याने दिसले नाही व त्यात कार अडकली. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. मुर्धा गावातील गल्ल्या पाण्यात बुडाल्या. मीरारोडच्या डेल्टा गार्डनपासून मीरारोड स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच रॉयल महाविद्यालय परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले.
नया नगर मधील बाणेगर शाळा, हैदरी चौक, गीता नगर फेज २, कानुंगो इस्टेट परिसरात पाणी तुंबले होते. रात्री पावसाने जोर धरल्याने शहरात पाणी जास्त प्रमाणात तुंबण्याची शक्यता आहे. रात्री पावसाने जोर धरल्याने मीरारोडच्या कृष्ण स्थळ, विनय नगर - सिल्वर सरिता, शांती नगर, काशीमीरा आदी अनेक सखल भागातील नागरिकांना पाणी साचण्याची भीती वाटत होती.