जल ठेकेदाराला दिला दणका, स्थायी समितीने दिली स्थगिती : ‘गोल्डन गँग’ने कामे आणल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:15 AM2017-10-11T02:15:26+5:302017-10-11T02:15:41+5:30
केडीएमसीतील विविध प्रभागांत पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
कल्याण : केडीएमसीतील विविध प्रभागांत पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी राजेश कन्स्ट्रक्शन या कंत्राट कंपनीची २ कोटी २१ लाख रुपये खर्चाची कामे संशयास्पद असल्याचा आरोप करून ती स्थगित ठेवण्याचा निर्णय सभापती रमेश म्हात्रे यांनी घेतला. ही कामे पालिकेतील गोल्डन गँगशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीच्या अन्य २ कोटी १० लाख रुपये खर्चाचे पाच विषय मंजूर करण्यात आले आहे.
देखभाल, दुरुस्तीचा विषय सभेत मंजुरीसाठी आला असता भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची देखभाल दुरुस्तीची कामे मंजुरीसाठी आली होती. तेव्हाही सभापती म्हात्रे हेच होते. तीच कामे पुन्हा मंजुरीसाठी आणल्याचा संशय म्हात्रे यांनी व्यक्त केला. त्यावर पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती गरजेची असल्याने सदस्य त्याला तातडीने मंजुरी देतात. मात्र, व्हॉल्व्हमन, प्लंबर, कामगार हे देखील कंत्राटदारामार्फत घेतले जातात. हे कामगार कंत्राटदाराचे असल्याने ते सदस्यांना जुमानत नाहीत. बाजारात एका कामगाराला दिवसाला ५०० रुपये मजुरी दिली जाते. हे कामगार २६२ ते ३८० रुपये मंजुरीवर कंत्राटदाराला कसे परवडते, असा सवाल सभापतींनी केला.
महापालिकेत १९९७ पासून व्हॉल्व्हमन, प्लंबर यांची भरती झालेली नाही. ती का झालेली नाही. पालिका कंत्राटदाराला चालवायचा द्यायची आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला. कंत्राटदार हा ५० लाखांचे काम घेते. प्रत्यक्षात तो २० लाखांचेच काम करतो. त्याला कसे काय परवडते. कंत्राटदार या कामात फालका मारतो. त्यात भ्रष्टाचार आहे. हा प्रकार रोखला पाहिजे, असा मुद्दा सभापतींना उपस्थित केला. त्याला शिवसेना सदस्य दशरथ घाडीगावकर यांनी दुजोरा दिला. राजेश कन्स्ट्रक्शनच्या कामाविषयी घाडीगावकर यांनीही संशय व्यक्त केला. कंत्राटदार अत्यावश्यक कामाला मंजुरी मिळणार म्हणून अधिकाºयांच्या मार्फत हे प्रस्ताव मंजुरीसाठी आणतो. त्याला अत्यावश्यक बाब म्हणून सभाही मंजुरी देते. मात्र, त्यापूर्वी खरोखरच काम योग्य प्रकारे केले जाणार आहे की नाही, याची देखील शहानिशा करणे आवश्यक असल्याचा मुद्दा घाडीगावकर यांनी मांडला.
याविषयी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले की, दोन वर्षांत देखभाल दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिलेली नाही. पाच वेळा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे विकास म्हात्रे यांचा संशय रास्त नाही. व्हॉल्व्ह मन, प्लंबर याची पदे भरली गेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कंत्राटदाराकडून ही कामे करून घेतली जातात. उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी व्हॉल्व्ह मन, प्लंबर आणि कामगारांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार करून प्रशासनास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.