जिल्ह्यात मार्चनंतर पुन्हा पाणीकपातीचे संकट !
By Admin | Published: January 30, 2016 02:24 AM2016-01-30T02:24:08+5:302016-01-30T02:24:08+5:30
पाण्याची कमतरता लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून लागू केलेली ३० टक्के म्हणजे आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात कायम ठेवून
ठाणे : पाण्याची कमतरता लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून लागू केलेली ३० टक्के म्हणजे आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात कायम ठेवून मार्चनंतर त्यात वाढ करण्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाने शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत दिले. विशेष म्हणजे मीरा-भार्इंदरला दिलेली सवलत रद्द केली असून त्यांनाही पाणीकपातीची सक्ती केली आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीसह टेमघर आणि एमजेपीचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन दिवसांची पाणीकपात आधीच लागू केलेली आहे. मात्र, मीरा-भार्इंदर महापालिका काही दिवसांपासून या कपातीतून वगळण्यात आली होती.
सर्वांनाच सक्तीची पाणीकपात
त्यामुळे अन्य महापालिकांवर अन्याय झाला होता. तो दूर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन मीरा-भार्इंदरसह सर्वांनाच सक्तीची पाणीकपात लागू केली आहे.
त्यामुळे ३० टक्के पाणीकपातीनुसार टेमघर प्राधिकरणाकडून मीरा-भार्इंदरला होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचे निश्चित झाले आहे.
पावसाच्या अवकृपेमुळे बारवी व आंध्रा धरणात या वर्षीदेखील पाणीसाठा कमी आहे. हा उपयुक्त पाणीसाठा १५ जुलैपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आधीच सर्व महापालिकांसाठी ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही कपात लागू राहणार आहे.
त्यानंतर, उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेण्याचे संकेत या वेळी देण्यात आले आहे. उपलब्ध जलसाठ्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या विभागाद्वारे सर्वांसाठी सक्तीची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला जातो. याप्रमाणे मार्चनंतर संभाव्य वाढीव पाणीकपात करण्याचे संकेत लघुपाटबंधारेने दिले.