पाणीकपातीचे संकट गडद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:27 AM2018-12-06T00:27:36+5:302018-12-06T00:27:43+5:30

एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Water crisis is dark | पाणीकपातीचे संकट गडद

पाणीकपातीचे संकट गडद

ठाणे : एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहराची पाणीकपात वाढणार आहे. मात्र, यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लघुपाटबंधारे विभागाला पत्र लिहून दरदिवशी ही कपात करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच २४ तासांचे शटडाउन करू,असे कळवले आहे. त्यानुसार, या विभागाने महापालिकेची ही मागणी तूर्तास मान्य केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यातील नागरिकांना रोजच्या रोज पाणीकपातीचा सामना करावा लागणार नसून आठवड्यातून एकदा २४ तासांच्या कपातीचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा हा विविध स्रोतांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानुसार, एमआयडीसीकडून होणाºया पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांत आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत पाणीकपात केली जात होती. तर, स्टेमकडून होणाºया पाणीपुरवठ्यातही १४ टक्के कपात केल्याने महापालिकेने याचेसुद्धा नियोजन दोन टप्प्यांत केले होते. त्यानुसार, शहरातील अर्ध्या भागाला १२ तास आणि उर्वरित भागाला १२ तास असे पाणीकपातीचे नियोजन केले होते.
आता भातसानेसुद्धा रोज १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आशयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि उर्वरित ठाण्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिका सध्या भातसावरून २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यामुळे रोज १० टक्के याप्रमाणे ठाणेकरांना २० दशलक्ष लीटर कमी पाणी मिळणार होते. भातसाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांना रोज पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे अनेक भागांना तिचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यताही होती. मात्र, पालिकेने यासंदर्भात लघुपाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे.
मंगळवारी यासंदर्भात पालिका आणि विभागाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार रोजच्या रोज १० टक्के पाणीकपात न करता आठवड्यातून एकदा २४ तासांची कपात घेऊ, असे पालिकेने संबंधित विभागाला सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे हाल कमी होणार असून आठवड्यातून एकदाच २४ तासांची कपात केली जाणार आहे. याशिवाय, २४ तासांची ही कपात करताना दुसरीकडे सध्या होणाºया २०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा हा १० दशलक्ष लीटरने वाढवून मिळावा, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे सहा दिवस ठाणेकरांना थोडा का होईना जास्तीचा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे पाणीटंचाईचे चटके कमी प्रमाणात सहन करावे लागणार आहे.
>येथे नसणार आठवड्यातून २४ तास पाणी
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु, आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या दोनही भागांचा पाणीपुरवठा यापुढे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ असा सलग २४ तास बंद राहणार आहे.
>एमआयडीसीकडून होणाºया पाणीपुरवठ्यातही १४ टक्के कपात लागू करण्यात आल्याने गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ या कालावधीत २४ तास पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा कौसा, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: Water crisis is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.