जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:34+5:302021-07-07T04:50:34+5:30

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात ...

Water crisis in July! | जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

Next

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात पाणीकपात लागू करण्याची वेळ येईल. गेल्या १५ दिवसांपासून येथील पाऊस गायब झाला असून चक्क कडक ऊन पडत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात केवळ १९ टक्के तर बारवी धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीकपातीचे संकट गडद झाले आहे.

जिल्ह्यातील शहरे, गावपाडे व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारली आहे. भातसाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जून महिन्यात ४७९ मि.मी. तर बारवी धरणात ७६४.५९ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास प्रशासनाला ऐन पावसाळ्यात पाणी कपात करावी लागेल.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी या महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद क्षेत्र आणि जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना (एमआयडीसी) बार्शी या एकमेव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणातील पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जुलैमध्ये अवघा २७ टक्के पाऊस बारवी धरणाच्या खानिवरे, कान्होळ, पाटगाव आणि ठाकूरवाडी आदी पाणलोट क्षेत्रात पडला. पाऊस सुरू नसल्याने या धरणाखालील पाणी उचलण्याची संधी नाही. त्यामुळे धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. या धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उद्योगधंदे, कारखान्यांना रोज पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. राठोड यांनी सांगितले.

बारवीत अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे एप्रिलमध्ये पाणीकपात करण्यात आली नाही. दरवर्षी १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस होऊन पाणीकपात रद्द होते. मात्र यंदा पावसाने जूनमध्ये हजेरी लावल्यानंतर दीर्घकाळ हुलकावणी दिल्याने जुलै महिन्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली.

-------

Web Title: Water crisis in July!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.