कोरोनापेक्षा आमच्या गावात पाणीटंचाईचे संकट मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:10 AM2021-04-07T00:10:09+5:302021-04-07T00:10:31+5:30
दूधगाववासीयांचा घोटभर पाण्यासाठी आटापिटा
- रवींद्र साळवे
मोखाडा : राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर वसलेल्या गोमघर ग्रामपंचायतमधील सुमारे १०० कुटुंबांच्या लोकवस्तीचे दुधगाव मार्चच्या सुरुवातीपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे.
दुधगावमधील पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून महिनाभरापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु अद्यापही टँकर उपलब्ध करून दिले नसल्याने स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री महिला-पुरुष लहानग्यांना विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळेत टँकरने पाणी पुरवले नाही तर आमच्याकडे कोरोनाने नव्हे तर पाणीटंचाईचे बळी जातील. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
या परिसरातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावापासून १ ते २ कि.मी. डोंगर उतारावर एकमेव असलेल्या विहिरीतील पाणी फेब्रुवारीच्या अखेर संपुष्टात येते. तेव्हापासून येथील आदिवासीना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
दरम्यान, टँकरबाबत मोखाडा तालुक्याचे तहसीलदार वैभव पवार यांना विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.
बंधाऱ्यांमध्ये पाणीच नाही
येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून तीन बंधारे बांधले आहेत, परंतु त्यामध्ये थेंबभरही पाणी नसल्याने काहीच फायदा झालेला नाही.
सर्वत्र कोरोनाचे मोठं संकट निर्माण झाले असताना आमच्याकडे मात्र त्यापेक्षाही मोठं संकट पाणीटंचाईचे आहे. आमच्या महिला रात्रीच्या वेळेत लहान मुलांना घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात. यावेळी एखादी दुर्घटना उद्भवल्या त्याला जबाबदारी कोण?
- सोमा वारे, स्थानिक
आदिवासी युवा कार्यकर्ता