ठाण्यावरील पाणीकपातीचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:40+5:302021-07-20T04:27:40+5:30
ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठाणे शहर व जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. पावसाच्या मुसळधार सरींनी ठाण्यातील रस्ते, ...
ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठाणे शहर व जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. पावसाच्या मुसळधार सरींनी ठाण्यातील रस्ते, वसाहती, बगिचे यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मागील २४ तासांत ठाणे शहरात १६१.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर सोमवारी दिवसभरात १३३.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात व रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दिवसभर रेल्वे वाहतूक विस्कळीत राहिल्याने मोजक्याच प्रवास करणाऱ्या ठाणेकरांचे हाल झाले. ठाण्यात ठिकठिकाणी झाडे, भिंती कोसळल्या. पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने काही ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. पूरस्थितीमुळे १४ गाड्यांचे नुकसान झाले. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीत वाळलेल्या झाडाची फांदी खाली पडून सुरक्षारक्षक जखमी झाला. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने ठाणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची दाट शक्यता आहे. पिसे पंपिंग स्टेशनमध्ये भातसा नदीच्या पुराच्या पाण्यासोबत पानवेली, गवत वाहून आल्याने पाण्याचा उपसा कमी होऊन पुढील दोन दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला असून रविवार व सोमवारी ठाण्याला झोडपून काढले. पावसाने दमदार बॅटिंग सुरूच ठेवली. सखल भागात पाणी तुंबण्याच्या २९ तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या. वृदांवन सोसायटी बसथांबा, के व्हीला राबोडी, सहयोग मंदिर रोड, कोपरी, दहीसर मोरी, शीळ फाटा, देवधर रुग्णालय नौपाडा, श्रीनगर, वागळे इस्टेट, वंदना सिनेमा आदी वेगवेगळ्या भागात पाणी तुंबले होते. शहरात पाच ठिकाणी सरंक्षक भिंती कोसळल्या आहेत. त्यामध्ये घोडबंदर रोड येथील कॉसमॉस लाउंज येथील भिंत पडल्याने पाच चारचाकी तर चार दुचाकींचे नुकसान झाले. मुंब्य्रातील अमृतनगर येथे १० ते १५ फुटांची भिंत पडली. खारीगाव, ठाणे चेंदणी कोळीवाडा, घोडबंदर रोड डोंगरीपाडा येथेही भिंत पडली. शहरात १६ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पडलेल्या झाडामुळे एका रुग्णवाहिकेसह महापालिकेच्या तीन गाड्यांचे नुकसान झाले. वाघबीळ विजयनगरी येथे पडलेल्या झाडामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच नौपाडा, कळवा, मुंब्रा, उपवन आदी ठिकाणी झाडे पडली आहेत. दोन ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे.
.........
फांदी पडून एक जण जखमी
शहरात वागळे इस्टेट, ढोकाळी आणि वाघबीळ येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. वाघबीळ नाका येथील लोटस सोसायटी परिसरात सोसायटीचा सुरक्षारक्षक संतलाल यादव (४०) यांच्या डोक्यात वाळलेल्या झाडाची फांदी पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला १३ टाके पडले असून त्यांना पातलीपाडा येथील रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या एका घटनेत डवले नगर भागात मेटल शेड पडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
..........
महापालिका मुख्यालयाच्या जवळील रस्त्यावर पाणीच पाणी
महापालिका मुख्यालयाच्या परिसरात दोन्ही बाजूंना पाणीच पाणी साचले. महापालिकेचा पांढरा हत्ती अशी ओळख असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात देखील पाणी शिरले होते. येथील गाळ्यांमध्येही गुडघाभर पाणी साचले. लोकपुरम येथे एक फुटओव्हर ब्रीज धोकादायक स्थिती आल्याने येथून ये-जा बंद केली.
.........
मासुंदा तलाव ओव्हर फ्लो, ठाणेकरांनी लुटला मासेमारीचा आनंद
ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलाव सोमवारी सकाळी ओव्हर फ्लो झाला. त्यातच ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबल्याने तेथील पाणीही रस्त्यावर आले. चिंतामणी चौकातून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले होते. मासुंदा तलावातील पाण्याबरोबर तलावातील मासे बाहेर आले. त्यामुळे ठाणेकरांनी मासेमारीचा आनंद लुटला.
...........
वाचली