पाणीकपात जाणार ३० टक्क्यांवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:32 AM2018-10-19T00:32:10+5:302018-10-19T00:32:13+5:30
- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती लोकसंख्या, अतिरिक्त पाणी उचलण्याची काही महापालिकांची चूक, नव्या धरणांचा अभाव यामुळे दिवाळीच्या ...
- मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती लोकसंख्या, अतिरिक्त पाणी उचलण्याची काही महापालिकांची चूक, नव्या धरणांचा अभाव यामुळे दिवाळीच्या आधीच २२ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. गेली दहा वर्षे सातत्याने येथील नागरिकांना कपातीचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला सात टक्के इतकी मर्यादित असलेली कपात गेली दोन वर्षे १४ टक्क्यांवर गेली होती. यंदात तर सुरुवातीलाच २२ टक्के कपात लागू असल्याने मे महिन्यात पाणीकपात ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ९७ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, लोकसंख्येला उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे नियोजन करण्यासाठी ही कपात लागू केली असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. मात्र, दरवर्षी वाढती पाणीटंचाई हा भविष्याच्या दृष्टीने धोका आहे.
उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. या नदीच्या पात्रातून कल्याण, डोंबिवली, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम पाणीपुरवठा यंत्रणा हे पाणी उचलतात. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. उल्हास नदीपात्रात आंध्र धरणातून आणि बारवी धरणातून पाणी साडले जाते. विविध स्थानिक स्वराज्य संस्था या उल्हास नदीपात्रातून पाणी उचलतात. नदीपात्रातून १२०० दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणी उचलले जात आहे. आंध्र धरणातून वीज तयार केली जाते. मागच्या वर्षी बारवी धरणात १०२ टक्के पाणीसाठा होता. आजमितीस बारवी धरणात ९७ टक्के पाणीसाठा आहे. १५ जुलै २०१९ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपात लागू केली आहे. १० आॅक्टोबर रोजी झालेल्या पाणीसाठा आढावा बैठकीनंतर २२ टक्के कपात लागू केली गेली. आठवड्यातून एक दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. २००७ पासून म्हणजे १० वर्षे पाणीकपात सुरू आहे. २००७ मध्ये केवळ सात टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यात वाढ होऊन उन्हाळ््यात मे अखेरीस १४ टक्के पाणीकपात केली जात होती. मागच्या दोन वर्षांत पाणीकपात १४ टक्के होती. आता चक्क सुरुवातीलाच २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
बारवी धरणाची उंची वाढविल्यास पाणीसाठा दुप्पट होणार असे सांगण्यात आले होते. हे काम अद्याप सुरूच आहे. प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे. बारवी धरणाच्या उंचीचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती माजी महापौर राजेंद्र देवळकर यांनी दिली. एमआयडीसी, महापालिका आणि जलसंपदामंत्र्यांनी या पाणीकपातीचा फेरविचार केला पाहिजे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अगोदरच टंचाईग्रस्त असलेल्या भागाला २२ टक्के पाणीकपातीची झळ जास्त बसणार आहे. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईवर तोडगा निघालेला नाही. महापालिकेकडून तेथे ४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पूर्वेतील पाणीप्रश्नावर आयुक्तांसोबत नुकतीच बैठक झाली.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांची स्वत:ची धरणे नाहीत. धरणे बांधण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही. २२ टक्के पाणीकपातीच्या त्रासातून सुटका हवी असेल तर धरण बांधणे अथवा विकत घेणे हे पर्याय आहेत. त्याचा गांभीर्याने विचार प्रशासनाने केलेला नाही.
दरवर्षी लागू होणाºया कपातीतून वाचण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर भविष्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. जळगाव अथवा लातूर शहरात १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होतो तशी परिस्थिती कल्याण, डोंबिवलीत निर्माण होऊ शकते. येत्या मे महिन्यात २२ टक्क्यांची कपात ३० टक्क्यांपर्यंत गेल्यास ती भविष्यातील संकटाची नांदी ठरेल, असे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारीही मान्य करतात.