ठाण्याच्या शहरी भागातही पाणीकपात, १० तारखेनंतर होणार कपात; कळवा, मुंब्य्रात कपातीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:33 AM2018-01-06T06:33:17+5:302018-01-06T06:33:31+5:30
उन्हाळ्यापूर्वीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे.
ठाणे - उन्हाळ्यापूर्वीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे. पाणीकपातीची पहिली कुºहाड एमआयडीसीने उगारल्यानंतर आता १० तारखेनंतर स्टेमदेखील कपातीचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे शहरी भागालाही पाणीकपातीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी कळवल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्र वार, ५ जानेवारीपासून दर १५ दिवसांनी म्हणजेच गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ येथे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा २४ तास पूर्ण बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पुढील आठवड्यापासून ठाणे शहरालादेखील पाणीकपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया स्टेमनेदेखील १० जानेवारीनंतर पाणीकपात लागू करण्याचे निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
10तारखेनंतर शहरी भागात कपात सुरू होईल. स्टेमने जरी पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी शहरी भागांना ३७० पैकी केवळ ११० एमएलडी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम ठाणेकरांना जाणवणार नाही.