ठाणे शहरात केवळ १२ तासच हाेणार पाणीकपात; महापालिकेने दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 02:24 AM2021-01-26T02:24:38+5:302021-01-26T02:24:54+5:30
नागरिकांना मिळाला मोठा दिलासा
ठाणे : एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणांनी ठाणे जिल्ह्यात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीचा फटका ठाण्याला सर्वाधिक बसणार आहे. कळवा, मुंब्रा भागाला अधिक झळा साेसाव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कपातीच्या काळात स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा विभागवार १२ तास सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा २४ ऐवजी १२ तासच बंद राहणार आहे. त्यानुसार घोडबंदर भागात १२ तास आणि उर्वरित ठाण्यात १२ तास असा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट केले आहे.
एमआयडीसी आणि स्टेमकडून १५ जुलैपर्यंत १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीमुळे महिन्यातून दोनदा २४ तास शहरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठामपाने ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी स्टेम प्राधिकरणाकडून, तर शुक्रवारी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात मनपा स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे. मनपाला स्टेमकडून प्रतिदिन ११० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे नियोजन ठाणे शहर, घोडबंदर, कळवा आणि मुंब्य्रातील काही भागांमध्ये करण्यात येते.
असे असेल शटडाउन आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार या कालावधीत ठाणे महापालिका स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने केले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबिळ आदी ठिकाणचा पाणीपुरवठा हा बुधवारी सकाळी ९ ते बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याच्या काही भागांचा पाणीपुरवठा हा बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.