मार्चअखेरीस १४ टक्के पाणीकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:05 AM2020-02-25T00:05:12+5:302020-02-25T00:05:55+5:30
साठा चांगला असल्याने तूर्तास संकट टळले
ठाणे : मागील वर्षी आॅक्टोबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्रात पाणी कपात सुरु झाली होती. परंतु यंदा पाऊस चांगला झाल्याने ठाणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तुर्तास लांबणीवर पडले आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून किंवा लघु पाटबंधारे विभागाकडून अद्यापतरी पाणी कपात लागू करण्याच्या हालचाली नसल्याचे दिसत आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात पाणी कपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील दोन वर्षे ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिकांच्या ठिकाणी पाणी कपातीचे संकट मोठ्या प्रमाणात ओढावले होते. यंदा मात्र पाणी कपातीचे चटके तुर्तास तरी जिल्ह्यात कुठेही सहन करावे लागत नसल्याचे दिसत आहे. ठाणे शहराला विविध प्राधिकरणांकडून ४८४ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातही धरणांची पातळी बऱ्यापैकी आहे. मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबरपासूनच ठाण्यात पाणी कपात सुरु झाली होती. मागील उन्हाळ्यात धरणांची पातळीही कमी होती. त्यामुळेच सुरवातीला १४ टक्के आणि त्यानंतर २० टक्क्यांवर पाणी कपात गेली होती. काही भागात आठवड्यातून दोन - दोन दिवस पाणी कपात केली जात होती.
यंदा धरणांच्या पातळीचा अंदाज घेतल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात पाणी कपात लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सॅत्रांनी दिली. ही कपात १४ टक्यांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.