भिवंडी तालुक्यात पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:48 AM2019-05-03T00:48:10+5:302019-05-03T00:49:00+5:30

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याचे पडसाद गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या बैठकीत उमटले.

Water dispute in Bhiwandi taluka, the villagers held the authorities | भिवंडी तालुक्यात पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

भिवंडी तालुक्यात पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

Next

रोहिदास पाटील/जनार्दन भेरे

अनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याचे पडसाद गुरुवारी झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या बैठकीत उमटले. टंचाईचा मुद्दा सभेत गाजला. शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तेव्हा उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तर, टंचाईग्रस्त गावपाड्यांना चौदाव्या वित्त आयोगामधील निधी खर्च करून टंचाई दूर करण्याची सूचना गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिली. उद्या ग्रामसेवकांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे ते म्हणाले.

समितीचे माजी उपसभापती व सदस्य प्रकाश भोईर यांनी पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागते. दरवर्षी टंचाई जाणवत असतानाही पाणीपुरवठा विभाग गप्प का असतो, असा प्रश्न उपस्थित करून अधिकाºयांना जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.

गेल्या वर्षीही पाणीटंचाईचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने मांडल्यामुळे अधिकाºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पाणीटंचाई दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने पंचायत समितीवर हंडामोर्चा काढून निषेध केला होता. तेव्हा झोपी गेलेल्या अधिकाºयांना जाग आली, त्याचीच पुनरावृत्ती करावी लागणार, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोने यांनी दिला आहे.

दरम्यान, गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या तरीचापाडा येथील टंचाईच्या बातमीची दखल घेत ग्रामविकास अधिकारी व्ही.डी. धोडगे यांनी कर्मचाऱ्यांसह पाड्याची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत तातडीने पावले उचलली जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यंदाही करणार पाहणी
भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, उपसभापती वृषाली विशे याही बैठकीत आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी पाणीटंचाई दूर करण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या. टंचाईग्रस्त गावपाड्यांची पुन्हा यावर्षीही पाहणी करणार असल्याची माहिती या दोघींनी दिली.

नांदवळमध्ये पाण्याचा ठणठणाट

शहापूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतच चालली आहे. तालुक्यातील महत्त्वाची नदी म्हणजे काळू नदी. बारमाही वाहणारी नदी अशी तिची ओळख आहे. विशेष म्हणजे ही नदी शहापूर आणि मुरबाड यांची हद्द आहे. या नदीच्या पलीकडे मुरबाड तालुका तर या बाजूला शहापूर आहे. नदीकिनारीच्या गावांसाठी ती वरदान आहे. मात्र, या उन्हाळ्यात अनेक गावांच्या परिसरात ती पूर्ण कोरडी झाल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून सर्व पाणीयोजना बंद झाल्या. पर्यायाने त्यात्या गावांना टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली.

यातच नांदवळ गावाचा समावेश होतो. गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजार. या गावाला जुनी नळपाणीयोजना असून ही योजना काळू नदीच्या पात्रातून बाजूला विहीर बांधून या नदीचे पाणी त्या विहिरीत घेऊन करण्यात आली. अनेक वर्षांपासून नागरिकांनी त्या पाण्याचा उपयोगही करून घेतला. मात्र, आज या काळू नदीचे पात्रच आटल्याने गावाला पाणीपुरवठा करणार कुठून, असा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवण्याची मागणी केली आहे.यापूर्वी काळू नदी बाराही महिने भरून वाहत असे. मात्र, दोनतीन वर्षांपासून ती कोरडी पडत आहे.

काळू नदीच्या पाण्यावरच नांदवळ गावची पाणीयोजना सुरू आहे. मात्र, सद्य:स्थितीत ती नदीच कोरडी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. - जयश्री जोशी, ग्रामसेविका

टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीचे जे प्रस्ताव आले आहेत, ते मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. - एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Water dispute in Bhiwandi taluka, the villagers held the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.