उल्हासनगरवासीयांची पाण्यासाठी वणवण; तीन दिवस पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:00 AM2019-05-14T00:00:02+5:302019-05-14T00:00:17+5:30

शहराच्या पूर्वेला सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली.

Water distribution of Ulhasnagar residents; There is no water supply for three days | उल्हासनगरवासीयांची पाण्यासाठी वणवण; तीन दिवस पाणीपुरवठा नाही

उल्हासनगरवासीयांची पाण्यासाठी वणवण; तीन दिवस पाणीपुरवठा नाही

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहराच्या पूर्वेला सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली. नादुरूस्त जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाला.
उल्हासनगर महापालिकेचे स्वत:चा पाणी पुरवठा स्त्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे कारण पुढे करून, गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद केला; मात्र पुर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने, शनिवारी सलग तीसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी पुरवठा झाला नाही. शुक्रवारी आणि शनिवारी पूर्ण दिवस, तर गुरूवारी व रविवारी अर्धा दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रविवारी सायंकाळपासून पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.
पूर्वेतील नागरिकांनी पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीकडे मोर्चा वळविला. गोरगरीब व सामान्य नागरिकांनी पिण्यास अयोग्य असलेले बोअरवेलचे पाणी उकळून वापरले. अनेक बोअरवेल, हातपंप बंद असल्याने, महिलांसह लहान मुले पाण्यासाठी भटकताना दिसली.
काही भागात टँकरने पाणी पुरवठा झाला, तर सोसायट्यांमधील नागरिकांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन गरज भागवली. सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी, अनेक भागात अद्यापही पाणी पुरवठा झाला नाही. सुभाष टेकडी परिसरात लोकांवर पाण्यासाठी बोअरवेल व हातपंपासमोर रांग लावण्याची वेळ आल्याची माहिती नगरसेवक प्रमोद टाले यांनी दिली.

कार्यालय निर्मनुष्य
नेताजी गार्डन येथील उपअभियंता पाणी पुरवठा व प्रभाग समिती क्रमांक ४ च्या कार्यालयाला सोमवारी दुपारी काही समाजसेवकांसह महिला, नागरिकांनी भेट दिली. त्यावेळी दोन्ही कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. मात्र कार्यालयातील फॅन, लाइट सुरू असल्याची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Water distribution of Ulhasnagar residents; There is no water supply for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी