पाणीचोरांना अभय, करदात्यांना भुर्दंड का?
By admin | Published: February 16, 2017 02:01 AM2017-02-16T02:01:33+5:302017-02-16T02:01:33+5:30
केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या
कल्याण : केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या माथी कर आणि दरवाढ मारण्याची प्रशासनाची भूमिका चुकीची आहे, असे सुनावत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी, करदरवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या विशेष सभेत फेटाळून लावला. दरम्यान, मंगळवारीच म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही करदरवाढ करणार नाही, अशी घोषणा केली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिका प्रशासनाने अग्निशमन करात दीड टक्का, तर पाण्याच्या दरात वाढ सुचवली होती. पाणीपुरवठा विभागातील आस्थापना खर्च, विद्युतदेयके, देखभालदुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याचबरोबर अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्याने करात वाढ करण्याचा प्रस्तावही बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला. परंतु, करदरवाढीच्या प्रस्तावावर मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुकांचे सावट होते. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास वेगळा संदेश जाण्याची शक्यता असल्याने तूर्तास ते स्थगित ठेवले जाण्याची दाट शक्यता होती. त्यातच, मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हात्रे यांनी करदरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
स्थायीच्या सभेला बुधवारी सुरुवात होताच अन्य महापालिकांच्या तुलनेत केडीएमसीत कर अधिक असल्याचे सर्वच सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. या जाचक करामुळे चोरवाटा शोधल्या जात असल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)