अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:32+5:302021-09-05T04:46:32+5:30
मीरारोड : सरकारी व आरक्षणाखालील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते; पण स्वतःच्या मालकी जागेत राहणाऱ्या स्थानिकांना ...
मीरारोड : सरकारी व आरक्षणाखालील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते; पण स्वतःच्या मालकी जागेत राहणाऱ्या स्थानिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे, अशी परिस्थिती उत्तनच्या केशव सृष्टी जवळील खाडीवर भागातल्या स्थानिकांची झालेली आहे.
भाईंदर पश्चिमेस उत्तनच्या केशवसृष्टीच्या पुढे असलेला खाडीवर म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. या भागातील स्थानिकांच्या जमिनी व घरे आहेत. गेल्या काही वर्षांत येथील जमिनी बाहेरच्यांनीही घेतल्या असून, त्यांचीदेखील बांधकामे झाली आहेत. या भागात पालिकेने रस्ते, पथदिवे, आदी सुविधा दिल्या आहेत. पालिका कर वसुली करते; पण केशवसृष्टीपर्यंत पाणी पुरवठा करणारी पालिका काही अंतरावरच असलेल्या स्थानिकांच्या घरांत पाणी मात्र अद्यापही दिलेले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे सरकारी व पालिका आरक्षणातील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पालिका झटपट नळ जोडण्या देते. त्यासाठी काही दलाल वा नगरसेवक मध्यस्थी म्हणून अधिकाऱ्यांशी संधान साधून असतात. कागदपत्रे खोटी वा अपुरी असली तरी जोडण्या दिल्या जातात. स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांच्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी येथे पालिकेने जलवाहिन्या टाकल्या. स्थानिकांनीदेखील नळजोडणीसाठी पालिकेकडे रीतसर अर्ज केले. परंतु, आजही लोकांना नळ जोडण्या दिलेल्या नाहीत. येथील राहिवाशांना टँकरचे पाणी घ्यावे लागते. काहीजणांना पायपीट करून पाणी आणावे लागते.