चाळी, उच्चभ्रू सोसायट्यांत शिरले पाणी; कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:21 PM2019-08-04T23:21:06+5:302019-08-04T23:21:23+5:30

खाडीकिनारी राहणाऱ्या रहिवाशांमध्ये धास्ती

Water entered into forty, highbrow societies | चाळी, उच्चभ्रू सोसायट्यांत शिरले पाणी; कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत

चाळी, उच्चभ्रू सोसायट्यांत शिरले पाणी; कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे व ग्रामीण भागाला रविवारीही सलग दुसºया दिवशी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांचे हाल झाले. उच्चभ्रू रहिवाशांची सोसायटी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-शीळ मार्गावरील पलावा सिटी, कासारिओ, लोढा हेवनमध्ये शेजारच्या देसाई खाडीचे पाणी शिरले. त्यामुळे तेथील घरे व वाहने पाण्याखाली गेली. वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे कल्याण पूर्वेतील भाग जलमय झाला. कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीतील परिस्थितीही पूरसदृश अशीच होती.

हवामान खात्याने दिलेल्या इशाºयानुसार रविवारीही पावसाचे धुमशान सर्वत्र चालूच होते. डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील मिलापनगर आणि आयरेगाव परिसरातील समतानगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर, खाडीकिनाºयाचा भाग असलेले पश्चिमेतील राजूनगर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, कोपर रोड, मोठागाव ठाकुर्ली, नवीन देवीचापाडा येथील घरांमध्ये पाणी शिरले होते.
एमआयडीसी येथील मिलापनगरमधील सोसायट्यांमधील इलेक्ट्रिक मीटर बॉक्स तसेच बंगल्यांमधील तळमजले पाण्याखाली होते. इलेक्ट्रिक मीटर बॉक्स आणि रस्त्यांवरील अनेक विद्युत फिडर बॉक्स पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या भागातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. परिसरात नाले बुजवून सुरू असलेली नवीन बांधकामे या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. विशेष म्हणजे एमआयडीसीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातही पाणी होते.

पावसामुळे रविवारी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या. डोंबिवली पूर्वेकडील सीकेपी सभागृहासमोरील झाड तेथून जाणाºया टेम्पोवर पडले. मात्र, जीवितहानी झाली नसली तरी टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. तत्पूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वेकडील नांदिवली येथील मठाच्या आवारातील पुरातन वृक्ष कोसळला. नांदिवली टेकडीवर जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्यातून वाट काढणे शक्य नसल्याने या परिसरातील दोन रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीद्वारे सुरक्षितस्थळी नेले. डोंबिवली पूर्वेला स्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यात रेल्वेही ठप्प झाल्याने पुन्हा त्याच पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढत घरी परतावे लागले.

पश्चिमेकडील खाडीलगतच्या भागातही पाणी भरले होते. गरिबाचावाडा, राजूनगर, महाराष्ट्रनगर, नवीन देवीचापाडा येथे घरांमध्ये सहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर खाडीच्या पाण्यात वाढ झाल्याने येथील घराघरांत शिरलेल्या पाण्याची पातळीही चांगलीच वाढली होती. येथील सत्यवान चौक आणि गोपीनाथ चौकात सायंकाळी तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते. अखेर, या भागातून हजारोंच्या संख्येने नागरिकांचे अन्यत्र ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन पथकासह, स्थानिक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता.

डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव कोपर रेल्वेस्टेशनसमोरील समतानगरमधील वसाहतीमध्येही खाडी आणि नाल्यातील पाणी घुसल्याने येथील २५ ते ३० चाळींमधील ४०० ते ५०० रहिवाशांना बोटींद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तेथील रिकामी असलेली एक बहुमजली इमारत व केडीएमसीच्या आयरे शाळेमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, खंबाळपाडा भागातील पाच चाळींमध्ये पाणी घुसल्याने येथील ३०० नागरिकांना येथील एका खाजगी शाळेत आसरा देण्यात आला. स्थलांतरित केलेल्या सर्वांना नाश्ता, जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाकुर्ली परिसरातील कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाºया रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांसाठी हा रस्ता काहीवेळ बंद झाला होता. वाहनचालकांना अंतर्गत भागांतील रस्त्याचा सहारा घ्यावा लागला होता.

पलावा परिसरातील रहिवाशांचे अतोनात हाल
कल्याण-शीळ महामार्गावरील देसाई खाडीनजीक असलेले लोढा संकुल, कासारिओ, पलावा सिटी तसेच परिसरातील ५० बंगल्यांमध्येही रविवारी आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. सुनियोजित शहर म्हणून हा परिसर विकसित करण्यात आला आहे. मात्र, रविवारी हा परिसर जलमय झाल्याने तेथील नागरिकांचे खूप हाल झाले. पार्किंगसह आवारातील वाहनेही पाण्याखाली गेली. इमारतींखाली पाणी असल्याने अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. दरम्यान, येथील पाण्याचा कल्याण-शीळ महामार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला.

उल्हास नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने कल्याण, डोंबिवली, पत्रीपूल, रेतीबंदर, आग्रा रोड, शिवाजी रोड, योगीधाम, घोलपनगर, शहाड परिसर, मुरबाड रोड, अनुपमनगर, मोहने, कोपर रोड, वालधुनी, ९० फुटी रोड आदी परिसरांस वीजपुरवठा करणारी सुमारे २५० रोहित्रे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली. यामुळे एक लाख ग्राहक प्रभावित होते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन, हा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महावितरण विभागाने दिली. दरम्यान, रायते येथून मोहने फिडरकडे जाणाºया मुख्य वाहिनीचा खांब वाकला.परंतु, पाण्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी जाता येत नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होता.

Web Title: Water entered into forty, highbrow societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.