Video : गरिबांच्या घरात शिरले पाणी, मदतीसाठी चाळीत धावला अपक्ष नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:35 PM2019-07-24T20:35:08+5:302019-07-24T20:35:26+5:30
आडीवली ढोकळी परिसर हा सखल भाग आहे. पहिल्या पावसातही या परिसरात पावसाचे पाणी विविध भागात शिरले होते.
कल्याण- शहराच्या पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील चाळ भागात पावसाचे पाणी शिरले आहे. जवळपास 100 घरांना पावसाच्या या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे हाल होत असून घर सोडून दूर पळावे लागत आहे.
आडीवली ढोकळी परिसर हा सखल भाग आहे. पहिल्या पावसातही या परिसरात पावसाचे पाणी विविध भागात शिरले होते. बुधवार सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने विजय पाटील नगर, ऑस्टीननगर, गणेश चौकात पाणी साठले आहे. या परिसरतील चाळवजा घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पावसाच्या पाण्याचा फटका घरांना बसला आहे. या परिसराचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने महिलांना दुपारचे जेवण करता आले नाही. तसेच मुलांची शाळा बुडाली आहे. पाटील यांनी पाणी शिरलेल्या घरातील काही कुटुंबांना त्यांच्या कार्यालयातील काही गाळे उघडे करुन त्याठिकाणी तात्पुरते राहण्याची सोय करुन दिली आहे. तसेच काही घरातील नागरिकांना दुपारच्या जेवणाचे फूड पॅकेटही दिले आहेत. या भागात पावसाचे पाणी साचते याविषयी प्रशासनाकडे यापूर्वीही तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. मागच्या वेळेसही पावसाच्या पाण्याचा निचरा किमान तीन दिवस झालेला नव्हता. आजही पावसाचे पाणी घरात शिरल्याने या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या जलनिस्सारण विभागातील अधिकारी साधी पाहणी करण्यासाठीही त्याठिकाणी पोहचलेले नाहीत. याविषयी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.