पावसाळ्यात म्हात्रेनगरमध्ये तुंबणार पाणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:20+5:302021-05-23T04:40:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील म्हात्रे नगरमध्ये नव्या नाल्याचे काम सुरू असून, त्याद्वारे विविध भागांतून येणारे सांडपाणी पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील म्हात्रे नगरमध्ये नव्या नाल्याचे काम सुरू असून, त्याद्वारे विविध भागांतून येणारे सांडपाणी पुढे खाडीच्या दिशेने सोडले जाते. मात्र, या कामादरम्यान टाकलेला पायपाचे तोंड लहान आहे. तसेच सांडपाण्याचे प्रमाण अधिक असून, वेगामुळे ते पायपामधून बाहेर येत आहे. परिणामी, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर यांनी केली आहे. दरम्यान, मनपाने वेळीच दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात येथील अनेक घरे पाण्याखाली जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
पेडणेकर म्हणाले, नाल्याचे काम सुरू असतानाच वेळोवेळी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येबाबत माहिती दिली आहे. परंतु ते दुर्लक्ष करीत असल्याने मनपा आयुक्तांना पत्र दिले. अनेक वर्षांपासून म्हात्रेनगर येथून जाणाऱ्या नाल्यातून सांडपाणी खाडीत सोडले जाते. जुन्या नाल्याचे पाइप मोठे होते. मात्र, आता टाकलेले पाइप आकाराने छोटे आहेत. त्यातून क्षमतेपेक्षा जास्त पाणी बाहेर येत असल्याने ते रस्त्यावर पसरत आहे. आता ऐन उन्हाळ्यात ही स्थिती असताना पावसाळ्यात किती गंभीर स्थिती निर्माण होईल, याचा विचार करून नियोजन करावे, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
शहरातील नामदेव पथ, पाथर्ली आदी ठिकाणचे मलनिस्सारण पाणी म्हात्रेनगरच्या नाल्यात सोडले जात आहे. नाल्याच्या बाजूला असलेल्या साईनाथनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना अनेक वर्षांपासून त्याचा त्रास होत आहे. आता नव्या नाल्याचे काम करण्यात आले असल्याने निदान यंदाच्या पावसाळ्यापासून तरी पाणी तुंबणार नाही, यासाठी मनपाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
-------------------------