ठाणे जिल्ह्यात सर्वत्र बरसल्या जलधारा
By admin | Published: July 16, 2017 02:56 AM2017-07-16T02:56:21+5:302017-07-16T02:56:21+5:30
मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सरासरी ८१.५० मिमी पाऊस झाला असून सात घरांचे नुकसान झाले आहे. माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार आणि रविवारी, असे दोन दिवस माळशेज घाटमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटनप्रेमी नाराज झाले आहेत.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शनिवारीही त्याचा जोर जिल्ह्यात कायम होता. जिल्ह्यात २४ तासांत एकूण ६७०.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यात १६८ मिमी सार्वधिक पाऊस मुरबाड तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ भिवंडी तालुक्यात ११० मिमी पाऊस झाला आहे. कल्याणमध्ये ९७ मिमी, अंबरनाथमध्ये ९०.६० मिमी, उल्हासनगर ८० मिमी, ठाणे ७२ मिमी आणि सर्वात कमी शहापूर तालुक्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे शहरातही मागील २४ तासांत ८१.५० मिमी पाऊस झाला असून विविध भागांत १० झाडे उन्मळून पडली आहेत. टिटवाळा येथील रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शुक्रवारी पाणी गेले होते. त्यामुळे १०-१२ गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, शनिवारी या पुलावरील पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी खुला झाला. तर, कल्याण-मुरबाड महामार्गावरी टाटा पॉवर हाउससमोरील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रेवती गावाजवळ भिंतीवर झाड पडले आहे. रायता-मानिवली रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातून माती ढासळू लागल्याचे मानिवलीच्या सरपंच सुनीता गायकर यांनी सांगितले.
कळव्यात सात घरे पडली : कळव्याच्या डोंगरावर वसलेल्या घोलाईनगर येथील तीन घरे त्या घराच्या खालील चार घरांवर पडली. त्यात एकूण सात घरांचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.