मुंबई-नाशिक महामार्गामधून वाहते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:25+5:302021-09-22T04:45:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की नाल्याचा बांध, असा सवाल वाहनचालक करत आहेत. या प्रकारामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महामार्गावरील चेरपोली घाटातील नांगर देवाजवळ रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यातून वाहने चालविणे अवघड होत आहे. दुचाकीस्वारांची तर परवाच केली जात नाही. रस्त्यावरील पाणी बाजूने जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे नाकातोंडात जात आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे आणखी अवघड होऊ जाते, असे काही दुचाकीस्वारांनी सांगितले.
या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत असून अनेक जणांचे बळी येथे गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे तर ही परिस्थिती अधिक भयावह होत आहे. या महामार्गावर वाहनचालकांकडून टोल घेतला जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने व यंत्रणेने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणार नाही, यासाठी रस्त्याला उतार देणे, यांसारख्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
‘कंपन्यांना काळ्या यादीत टाका’
सध्या महामार्गाची परिस्थिती पाहता हा महामार्ग आहे की पाण्याचा नाला हेच समजत नाही. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश विशे यांनी केली आहे.
-----------