ओवळा- माजिवडा पट्यात ६७ विहिरींचे पाणी येणार वापरात; विहिरींच्या ठिकाणी बसवणार अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लान्ट
By अजित मांडके | Published: February 15, 2023 04:27 PM2023-02-15T16:27:17+5:302023-02-15T16:35:15+5:30
ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघात असलेल्या आणि वापरात नसलेल्या ६७ विहीरींचे पाणी आता इतर वापरासांठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
ठाणे : ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघात असलेल्या आणि वापरात नसलेल्या ६७ विहीरींचे पाणी आता इतर वापरासांठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या विहिरींच्या ठिकाणी फील्ट्रेशन प्लान्ट लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता येथील ६७ विहिरांच्या ठिकाणी अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लान्ट उभारले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव आता मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे धाडण्यात आला आहे. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. यामुळे आता घोडबंदर पट्यातील नागरीकांना या विहिरींचे पाणी पिण्याव्यतीरिक्त इतर कामांसाठी वापरता येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ५५५ विहिरी आहेत. त्यातील २१६ विहीरांचे पाणी वापरात नसल्याचे दिसून आले आहे. तर वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ एवढी आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या विहिरींची साफसफाई केली जात असून ते पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करुन दिले जात आहे.
परंतु आता ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात असलेल्या विहिरींच्या ठिकाणी अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लान्टची उभारणी केली जाणार आहे. या पट्यात असलेल्या ६७ विहिरींच्या ठिकाणी हा प्लान्ट उभारला जाणार आहे. तसेच येथील विहिरींची सफाई आणि गाळ काढला जाणार आहे. याशिवाय येथील विहिरींची दुरुस्ती याशिवाय याच ठिकाणी सोलर पॅनल देखील बसविले जाणार आहे. या सर्वांचा खर्च हा ५० कोटींच्या आसपास धरण्यात आला आहे. याशिवाय संबधींत ठेकेदाराला पुढील पाच वर्षे निगा देखभाल देखील करावी लागणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
या कामांसाठी होणार पाण्याचा वापर
उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असते, अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा वापर हा इतर कारणांसाठी देखील होत असतो. परंतु आता या विहिरींचा वापर कपडे, भांडी, शौचालये, गार्डन आदींसह इतर कामांसाठी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.