गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणी कपात; ठाण्यातील महत्वाच्या शहरातील नागरिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:39 AM2022-03-21T10:39:53+5:302022-03-21T10:40:02+5:30
-पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही ...
-पंकज पाटील
अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही शहरांवर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यास जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहराला मिळून ११० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. त्यातील ९५ दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीच्या बॅरेज धरणातून उचलण्यात येत आहे, तर उर्वरित १५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत अंबरनाथला पुरवण्यात येत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. पाणीपुरवठ्याची योजना सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, जुन्या जलवाहिन्या तसाच ठेवल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे.
मागील दोन ते तीन वर्षांत अंबरनाथची पाण्याची गरज वाढली असून, पुरेसे पाणी अद्यापही या दोन्ही शहरांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. मात्र, ते रोखण्यात अपयश आल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणीटंचाईला केवळ पाणी चोरीच जबाबदार नसून, जीवन प्राधिकरणाचे चुकलेले नियोजन हे देखील महत्त्वाचे कारण आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनामार्फत टँकरची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
या भागांतील नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी
- अंबरनाथच्या महेंद्र नगर, फुले नगर, कमलाकर नगर, नालंदा नगर, बुवापाडा, मोरीवली पाडा आणि गांधी नगर या भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
- बदलापूरमध्ये कात्रपगाव, शिरगाव, खरवाई, बदलापूर गाव या भागांमध्ये टंचाई आहे. या भागातील पाणीटंचाईमुळे खासगी टँकर मालक या टंचाईचा फायदा उचलताना दिसत आहेत.