उल्हासनगरात पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महापालिकेच्या २ कंत्राटी कामगारांना मारहाण
By सदानंद नाईक | Published: December 20, 2023 07:38 PM2023-12-20T19:38:34+5:302023-12-20T19:39:09+5:30
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर : गोलमैदान येथील जलकुंभाच्या खाली बुधवारी सकाळी जमा झालेल्या नागरिकांनी आम्ही सांगतो तेथे पाणी सोड असे म्हणत दोन कंत्राटी कामगारांना चप्पल व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर महापालिकेचे कंत्राटी कामगार बाबलुकुमार भैय्याकीयारद व अविनाश बाविस्कर हे पाणी सोडण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे दोन्ही कर्मचारी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता पाणी सोडण्यासाठी गोलमैदान येथील जलकुंभाखाली गेले असता, त्याठिकाणी वंजारी पाड्याचे काही नागरिक जमा झाले होते. त्यापैकी किशोर शेळके, पुष्पा पवार यांच्यासह अन्य जणांनी आम्ही सांगतो तेथेच पाणी सोडा असा पवित्रा घेतला. त्यानंतर बाविस्कर या कर्मचाऱ्याने महापालिकेचे अभियंता दिपक ढोले यांना फोन करून जमावा पैकी पुष्पा पवार या महिलेला बोलण्यास सांगितले. मात्र त्यांच्यात फोनवर शाब्दिक चकमक उडाल्याने, वातावरण गरम झाले. यावेळी संतप्त झालेल्या किशोर शेळके, पुष्पा पवार यांच्यासह अन्य जणांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना चप्पल व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
शहरातील विविध पाणी टंचाई निर्माण झाली असून भुयारी गटारीच्या कामामुळे जलवाहिन्या फुटत आहे. बुधवारी कुर्ला कॅम्प परिसरात भुयारी गटार फुटल्याचा प्रकार घडला आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात किशोर शेळके, पुष्पा पवार यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.