पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:25+5:302021-03-09T04:43:25+5:30
बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ...
बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ३० संतप्त महिलांनी जागतिक महिला दिनीच गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयावर धडक दिली.
लाखो रुपये मजीप्राला दिल्याने आमची एरंजाड चिकनपाडा येथील जुनी लाईन बिल्डरला दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. त्यामुळेच बिल्डिंगमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळते, मात्र आम्ही गाववाले असून, आम्हाला फक्त अर्धा तास आणि तेही गढूळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे. तसेच या गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवून हे पाणी तुम्ही तरी प्याल का? असा प्रश्न उपस्थित करून पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी कुसूम मेहेर, कविता मेहेर, सुषमा बोराडे, नयन बोराडे, सदानंद मेहेर, रूपेश मेहेर विष्णू वझे व इतर नागरिक होते.
काेट
चिकनपाड्याला सोनिवली नाक्यावरून पाणी देत होतो. पावसाळ्यात ही लाईन चोकअप झाल्याने तात्पुरती लाईन एकविरा धाब्याजवळ क्राॅस कनेक्शन करून दिली होती. मात्र, रोड क्राॅसिंगची पाईपलाईन सारखी फुटत असल्याने मागील आठवड्यात बिडाची पाईप टाकत असताना अगोदरचे गढूळ पाणी त्यामध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी गढूळ पाणी येत असेल, मात्र पुढील दोन दिवसांत त्यांची पाण्याची समस्या सोडवली जाईल.
- सुहास मगदूम, डेप्युटी इंजिनिअर, मजीप्रा.