केडीएमसी मुख्यालयात होतेय पाणीगळती, दर मिनिटाला चार लीटर वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 03:05 AM2018-05-17T03:05:58+5:302018-05-17T03:05:58+5:30
‘पाणी जपून वापरा’, असा संदेश केडीएमसी देत असली, तरी पालिकेच्या मुख्यालयातच पाण्याची गळती होत आहे.
कल्याण : ‘पाणी जपून वापरा’, असा संदेश केडीएमसी देत असली, तरी पालिकेच्या मुख्यालयातच पाण्याची गळती होत आहे. त्यात दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय भवनाच्या तळ मजल्यावर प्रसाधनगृह आहे. त्यातील नळाची तोटीच गायब झाली आहे. या प्रसाधनगृहाचा वापर महापालिकेचे कर्मचारी व बाहेरील नागरिकही करतात. त्यामुळे नळाची नासधूस कोण करते, याचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे. मात्र, तो घेतला जात नाही. दोन महिन्यांपासून हा नळ फुटला आहे. त्याद्वारे १५ सेकंदाला एक लीटर पाणी वाया जात आहे. दर मिनिटाला चार लीटर, तर दर तासाला २४० लीटर पाणी वाया जात आहे. २४ तासांत पाच हजार ७६० लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेने २००८ मध्ये केलेल्या पाणी लेखापरीक्षणानुसार २१ टक्के पाणीगळती महापालिका हद्दीत आहे. जागतिक निकषांनुसार १५ टक्के पाणीगळती असणे काही गैर नाही. मात्र, महापालिका हद्दीत २१ टक्के पाणीगळती आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेने २००८ पासून आजवर काहीच केलेले नाही. तसेच १० वर्षांत महापालिकेस पाण्याचे लेखापरीक्षण करण्याची गरज भासलेली नाही. महापालिकेस गळती रोखायची नसल्याने लेखापरीक्षण कशाला, अशीच मानसिकता अधिकाऱ्यांची असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.