आजदेला महापालिकेच्या व्हॉल्व्हवरून पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:18 AM2019-08-03T00:18:52+5:302019-08-03T00:18:55+5:30
नगरसेवकाने केली मागणी : ऐन पावसाळ्यात भेडसावणाऱ्या टंचाईमुळे नागरिक आंदोलन करण्याची शक्यता
डोंबिवली : पूर्वेतील केडीएमसीच्या आजदे प्रभागात पाण्याचे समान वितरण होत नसल्याने दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. एमआयडीसीकडून पूर्णवेळ पुरवठा होत नाही. तसेच तो कमी दाबाने होतो. महापालिकेकडूनही कमी पाणी येते. त्यामुळे या प्रभागासाठी महापालिकेच्या घरडा सर्कल येथील एअर व्हॉल्व्हवरून पुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी केली आहे. यासंदर्भात काळण यांनी बुधवारी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत त्यांना साकडे घातले.
आजदे प्रभागाची लोकसंख्या ३५ हजार असून त्याच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे काळण यांनी नुकतीच स्वखर्चातून ३०५ मीटरची जलवाहिनी टाकली. मात्र, तरीही पाणीसमस्या सुटलेली नाही. गेल्या महिन्यापासून एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा हा २४ तासांवरून सहा तास जेमतेम होत असल्याने आजदेगाव, आजदेपाडा येथे पाणीच मिळत नाही. त्यामुळे नागरिक काळण यांच्याकडे तक्रार, गाºहाणी मांडत आहेत. काळण हेदेखील महापालिकेचे प्रभाग अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ते हैराण झाले आहेत. अखेरीस, त्यांनी महापालिका मुख्यालयाला पत्र लिहून पाणीसमस्या सोडवण्याची मागणी केली आहे. भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे कधीही महापालिका, एमआयडीसीविरोधात आंदोलन होऊ शकते, असा इशारा काळण यांनी दिला आहे. सात दिवसांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त गोविंद बोडके, ई प्रभागाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
जास्त पुरवठा शक्य नाही
मीरा-भार्इंदरलाही जास्त पाणी सोडल्याने या ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची शक्यता आहे. आजदे प्रभाग हा मोठा असून तो एका टोकाला आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा एमआयडीसीकडून तेथे केला जातो. आजदेसाठी यापेक्षा जास्त पुरवठा करता येणे शक्य नाही, अशी माहिती डोंबिवली एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
विनोद काळण यांनी केलेली एअर व्हॉल्व्हवरून पाणीपुरवठ्याची मागणी ही रास्त नाही. तसे केल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यातच त्यासंदर्भातील निर्णय माझ्या स्तरावर होऊच शकत नाही.
- राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, केडीएमसी